वसई-विरार महापालिकेकडे आलेले अभिप्राय महापालिकेच्या बाजूचे

वसई :  गावे वगळण्यासंदर्भात वसई-विरार पालिकेकडे आलेल्या हरकती आणि अभिप्रायांमध्ये नागरिकांचा कल हा महापालिकेच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘ग्रामपंचायतीची पुनस्र्थापना व्हावी का नगरपरिषद असावी’ याबाबत पालिकेकडे एकूण दोन हजार ७०८  अभिप्राय आले होते. त्यात ‘पालिकाच हवी’ असे मत दर्शविणारे दोन हजार ७०४ अर्ज आहेत.  तर ग्रामपंचायत हवीत म्हणून केवळ ४ अर्ज आले आहेत.

वसई-विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्यासाठी शासनाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यानुसार याबाबतचा निर्णय घेण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांची समिती स्थापन करण्यात आली होती. २९ गावांमध्ये ग्रामपंचायतीची पुनस्र्थापना करावी की त्या गावांची नगरपरिषद स्थापन करावी, (युनिट ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन काय असावे ) याबाबत नागरिकांकडून अभिप्राय मागविण्यात आले होते. २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत वसई-विरार महापालिका उपायुक्त, उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी), निवासी उपजिल्हाधिकारी तसेच प्रादेशिक उपसंचालक यांच्याकडे अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते. पालिकेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार पालिकेकडे  एकूण २ हजार ७०८ अभिप्राय आले होते. त्यापैकी महापालिकेतून गावे वगळू नये असे मत नोंदविणारे २ हजार ७०४ अभिप्राय होते. तर गावे वगळावी असे मत नोंदविणारे केवळ ४ अर्ज होते.

हरकतीदेखील महालिकेच्या बाजूने

शासनाने २९ गावे वगळण्यासाठी १७  ते २४ नोव्हेंबर या कालावधीत नागरिकांच्या हरकती मागविल्या होत्या. पालिकेकडे  एकूण ९ हजार ४३८ अर्ज आले होते. त्यातील गावे महापालिकेतून वगळू नये यासाठी ९ हजार १८५  तर  गावे वगळावी यासाठी  २३३ अर्ज आले तर २० अर्ज तटस्थ होते. प्रांतअधिकारी, जिल्हाधिकारी आणि कोकण विभागीय कार्यालयात आलेल्या हरकती आणि अभिप्रायांची छाननी-  सुरू आहे. त्याला आणखी दोन दिवस लागतील असे प्रांतअधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.

प्रांताकडील अभिप्रायांची मोजणी सुरू

हरकती आणि अभिप्राय हे पालिकेबरोबरच प्रांतअधिकारी कार्यालय, उपजिल्हाधिकारी आणि कोकण विभागीय आुक्तांकडे नोंदविण्यात आले आहेत. केवळ पालिकेने आपल्याकडील अभिप्राय आणि हरकतींची माहिती जाहीर केली आहे. तर प्रांत कार्यालय आणि इतर विभागातील आकडेवारी आल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल असे गाव बचाओ आंदोलनातील नेत्यांनी सांगितले. पालिकेकडील हरकतींबाबतही आक्षेप घेण्यात आला आहे.

इतर भागातीलही हरकती, अभिप्राय

हरकती आणि अभिप्राय हे केवळ २९ गावांतील नागरिकांनीच नोंदवायचे होते. परंतु शहराच्या इतर भागातील नागरिकांनी  पालिकेकडे हरकती आणि अभिप्राय नोंदवले आहेत, ते ग्राह्य धरले जाऊ नये, या हरकती कुणी नोंदविल्या त्याची   माहिती  घेणार आहोत, असे  आंदोलनातील नेते विजय पाटील यांनी सांगितले. तर पालिकेला अशी आकडेवारी परस्पर जाहीर करण्याचा अधिकारच नाही असे याचिकाकर्ते अ‍ॅड जिमी घोन्साल्विस यांनी सांगितले.