अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून वाममार्गाला लावण्याच्या प्रकरणात नगरमधील सातजणांना जन्मठेपेची तर अन्य आठजणांना दहा वर्षे व इतर ४ आरोपींना ८ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी सुनावली.
न्या. अंबादास जोशी व न्या. यू. डी. साळवी यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने २२ आरोपींना जन्मठेप सुनावली होती. त्याविरोधात आरोपींनी खंडपीठात दाद मागितली होती.  
नगरमधील दोन अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून वाममार्गाला लावल्याप्रकरणी २२ फेब्रुवारी २००६ रोजी गुन्हा दाखल झाला होता. यातील आरोपी शीला बारगळ हिचे घर, तसेच अनेक हॉटेलांत आणि धुळे जिल्हा परिषदेच्या सभापतीच्या निवासस्थानी वारंवार सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणात बडी राजकीय धेंडे, धनिकांची मुलेही सामील होती. त्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचा तपास करतानाही वारंवार राजकीय दबाव येत होता. अखेर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने याप्रकरणी तपास तडीस नेला.
शीला बारगळ हिचे खटला चालू असतानाच निधन झाले. दुसरा आरोपी राम साळवे अद्याप फरारी असून सतीश बन्सी पाथरे हा कोमात असल्याने त्याच्याबाबतचा निकाल नगरच्या न्यायालयात प्रलंबित आहे, तर चेतन भळगट याच्याबाबतचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.
खंडपीठाने तुकाराम मिसाळ (वय ४०), रमेश बरकसे (४१), हरजितसिंग राजपाल (४०), रामराव डेंगळे (५८), रमाकांत डेंगळे (२२), अशोक कासार (३५), विलास कराळे (३२) या ७ जणांना जन्मठेप ठोठावली. वसंत पावरा (३४, धुळे), रवींद्र थोरात (३२), राजेंद्र थोरात (३२), ज्ञानदेव गोंदकर (४६), अब्दुल हक कुरेशी (३७), अजय काटे (३२, नंदूरबार), बालकृष्ण गोयल (३८), रघुनाथ झोळकर (३८) यांना प्रत्येकी १० वर्षे सक्तमजुरी ठोठावली. तसेच हार्दिक जग्गड (२६), आकाश राठी (२४), आत्माराम डेंगळे (२४) व रुचीन मेहता (२२) या चौघांना ८ वर्षे शिक्षा ठोठावण्यात आली. दोन अल्पवयीन मुलींनी याबाबत तक्रार दाखल केली होती.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या सुषमा चव्हाण, सुषमा देशमुख यांचे या प्रकरणाच्या तपासात मोठे सहकार्य मिळाल्याचे विशेष सरकारी वकील विजय सावंत यांनी सांगितले. त्यांना सहायक सरकारी वकील वैशाली शिंदे यांनी मदत केली.     
स्नेहालयकडून स्वागत
सन २००६ मध्ये राज्यभर गाजलेले बाल लैंगिक शोषणाचे हे प्रकरण नगरच्या स्नेहालय या संस्थेने उघडकीस आणले आणि धाडसाने तडीस नेले. या निकालाचे संस्थेने स्वागत केले आहे.