अहमदनगरमध्ये शिवसेनेच्या दोन नेत्यांच्या हत्येनंतर उडू लागलेली राजकीय राळ पाहता, येत्या सात-आठ महिन्यांत होऊ  घातलेल्या महापालिका निवडणुका व नंतर लगेचच तोंडावर येणाऱ्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये या हत्यांचे भांडवल करून त्यावर मतांची मोट बांधण्याचा राजकीय नेत्यांचा प्रयत्न राहणार हे स्पष्ट होऊ  लागले आहे. मात्र, आजवर उदासीनतेत हरवलेल्या नगरमध्ये आता या घडामोडींनंतर जाग येऊ  लागली असून, अशा गोष्टींच्या राजकारणाला कोणत्याच आगामी निवडणुकीत फारसे स्थान मिळणार नाही याची चुणूकही दिसू लागली आहे.

काँग्रेसचे माजी महापौर संदीप कोतकर यांना खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या नगरसेवकपदासाठी केडगावमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीतील हिंसाचारात संजय कोतकर आणि वसंत ठुबे या स्थानिक शिवसेना नेत्यांना भर रस्त्यात गोळ्या घालून व कोयत्याचे वार करून ठार करण्यात आले. त्यानंतर नगरमध्ये दाटलेले भय आणि तणाव अजूनही ओसरलेला नाही. या हत्येनंतर कोतकर, जगताप, कर्डिले यांच्या पूर्वेतिहासाची घरोघरी उजळणी होऊ  लागली असून, दहशत व गुंडगिरीच्या असंख्य कहाण्याही दबक्या सुरात सांगितल्या जात आहेत. ही घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी स्थानिक खासदार दिलीप गांधी व नगरचे पालकमंत्री राम शिंदे हे दोघे शिर्डी येथील एका पंचतारांकित सोहळ्यात मग्न होते. इकडे नगरमध्ये कायदा सुव्यवस्था स्थिती चिंताजनक बनलेली असताना दोघेही नगरकडे फिरकले नसल्याने प्रचंड संताप व्यक्त होत होता. खासदार गांधी यांनी तर या प्रकरणानंतर पाळलेले मौन तब्बल चार दिवसांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सोडले. या घटनेतील दोषींना कठोर शासन झाले पाहिजे, अशी भूमिका घेत त्यांनी माजी शिवसेना आमदार अनिल राठोड यांच्यावर मनसोक्त तोंडसुख घेतले, तेव्हाच, हा मुद्दा आगामी निवडणुकांचे भांडवल म्हणून वापरला जाणार हे स्पष्ट झाले होते.या घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, त्यांचे वडील व राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य अरुण जगताप, तसेच भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, बाळासाहेब कोतकर, भानुदास कोतकर यांच्यासह अनेक स्थानिक नेत्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले आणि कर्डिले, कोतकर कुटुंबांच्या कहाण्यांना वाचा फुटली. गुंडगिरीच्या विरोधातील आजवर दबलेला आवाज स्पष्टपणे उमटण्याची चिन्हे आता दिसू लागली असून त्याची चुणूक आजच नगरमध्ये पाहावयास मिळाली. नगरमधील काही स्वयंसेवी संस्थांनी शहरातील ढासळती कायदा-सुव्यवस्था, गलिच्छ राजकारण आणि कोतकर-ठुबे हत्येच्या विरोधात काढलेल्या मूक मेणबत्ती मोर्चात शहरातील संवेदनशील नागरिक प्रथमच रस्त्यावर आले. गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या आणि दहशत, गुंडगिरीने सत्ता राबविणाऱ्या लोकांना मतदान करू नका असा स्पष्ट संदेश या मूक मोर्चाने दिल्याने, शहरातील सांस्कृतिक, सामाजिक जाणिवांची मध्यंतरीच्या काळात निर्माण झालेली मरगळ दूर होणार असे स्पष्ट दिसू लागले आहे.

ज्या नगर जिल्ह्याला सामाजिक, सांस्कृतिक चळवळींचा आणि विकासाच्या राजकारणाचा वारसा लाभला आहे, त्याच जिल्ह्यात, राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरू झाल्याने सामाजिक, सांस्कृतिक जाणिवा जवळपास संपुष्टातच आल्या होत्या. साखर, सहकार आणि सत्ता या शक्तिस्थळांचा विधायक वापर करून जिल्ह्याचा विकास करणाऱ्या नेत्यांची पिढी संपल्यानंतर राजकारणाचे मोठय़ा प्रमाणावर गुन्हेगारीकरण सुरू झाले. छिंदमसारख्यांना पाठीराखे मिळू लागले, कट्टे, कोयत्यांनी राजकीय वैराचे हिशेब चुकते होऊ  लागले. कधीकाळी रस्त्यावर लस्सी विकणारा नेता खासदार झाला, दारूचे फुगे वाहणारी, हमाली करणारी कुटुंबे सत्तेच्या गोतावळ्यात दाखल झाली, तर पावभाजी विकणारा माणूस आमदार, मंत्री झाला. यातूनच नगरची राजकीय प्रगल्भता संपुष्टात आल्याची खंत आज सर्वसामान्य नगरकर व्यक्त करतात. नगरच्या सांस्कृतिक, सामाजिक वर्तुळात, ज्याच्या शब्दाला प्रतिष्ठा असेल असे एखादे नावदेखील आज कुणाला सांगता येत नाही. अशी एक सामाजिक पोकळी निर्माण झालेली असतानाच, राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत गेल्याने नगरवासीयांच्या सांस्कृतिक मानसिकतेलाही जबर धक्का बसला आहे. गेल्या अनेक वर्षांत नगर शहराने सामाजिक, सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या कार्यक्रमाचा अनुभवही घेतलेला नाही आणि राजकारणातील गुन्हेगारीमुळे राजकारणातही सामान्य नगरकरास फारसा रस उरलेला नाही.

गेल्या काही वर्षांत उदयास आलेल्या राजकीय घराण्यांचे पक्ष वेगवेगळे असले, तरी सोयरीकीमुळे, राजकारणात एक प्रकारची संघटित गुन्हेगारीच सुरू झाल्याचे शहरात बोलले जाते. ज्या केडगावात हे हत्याकांड घडले, तेथे गुंठासम्राटांची दहशत माजली असून आरोपींनी गुंड टोळ्या पोसल्याची कुजबूज असल्याने, हत्याकांडानंतर केडगावातील नागरिक काही बोलतच नाहीत. खुद्द नगर शहरातही कोतकर, कर्डिले, जगताप, एवढेच नव्हे, तर गांधी, शिंदे या प्रस्थापित राजकीय घराण्यांबद्दल नाराजीचेच सूर आहेत. यापैकी कोणीच नगरच्या समस्यांकडे कधीच लक्ष दिले नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. पंचवीस वर्षे आमदार राहिलेले शिवसेनेचे अनिल राठोड यांनी विकासाचे एक तरी काम केले का, असा आव्हानात्मक सवाल करणारे भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी आपल्या खासदारकीच्या दीर्घ कारकीर्दीत कोणता विकास केला, हे भाजपचा एखादा स्थानिक कार्यकर्तादेखील सांगू शकत नाही.

नागरिकांच्या जाणिवा जागृत

मंगळवारी संध्याकाळी शहरात निघालेला मूक मोर्चा ही नागरिकांच्या जाणिवा जागृत झाल्याची खूण ठरणार आहे. दहशत, खंडणीखोरी, हत्या, गुन्हेगारीचा शिरकाव झालेले राजकारण झिडकारण्याची शपथ या मोर्चात नागरिकांनी घेतली, तेव्हा, मधल्या काळात पुसल्या गेलेल्या सामाजिक चळवळीच्या खुणा पुन्हा जिवंत झाल्याच्या जाणिवेने नगरमधील सर्वसामान्य नागरिक सुखावला आहे. मोर्चात सहभागी न होता रस्त्याकडेला उभे राहून तो न्याहाळणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यातही हे समाधान उमटले, ही आगामी निवडणुकांतील नेत्यांच्या गणितांना धक्का देणारी बाब ठरेल, अशी चिन्हे दिसत आहेत.