न्यायालयाच्या आदेशानुसार शिराळ्याची जगप्रसिद्ध नागपंचमी रविवारी पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. सकाळी अंबामातेच्या मंदिरात नागाची पूजा केल्यानंतर घरोघरी महिलांनी जिवंत नागाची पूजा करुन मोठय़ा उत्साहात शिराळकरांनी नागपंचमी साजरी केली.
शिराळा येथे जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा १२ व्या शतकापासून आहे. महाजन यांच्या घरात ही परंपरा सुरु झाली असून आता याला सार्वत्रिक रुप आले आहे. उच्च न्यायालयाने नागांच्या स्पर्धा घेण्यास आणि मिरवणुका काढण्यास प्रतिबंध घातला असून याचे काटेकोर पालन यावर्षीही करण्यात आले.
शिराळ्यात ६५ ते ७० सार्वजनिक मंडळे असून दर वर्षी या मंडळांकडून नाग पकडले जातात.  आज सकाळी मातीच्या गाडग्यात ठेवलेले नाग घेऊन कार्यकत्रे पूजेसाठी अंबामातेच्या मंदिरात गेले होते.  नागपूजन झाल्यानंतर अंबा मातेच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. मंदिरातील पूजा झाल्यानंतर घरोघरी महिलांकडून पूजा करण्यासाठी हे नाग नेण्यात येत होते.
नागांची पूजा झाल्यानंतर सार्वजनिक मंडळांनी नाग प्रतिमांची मोठय़ा जल्लोषात मिरवणूक काढली. ढोल-ताशा यांचा गजर करीत या मिरवणुका गावच्या मध्यपेठेतून वाजत-गाजत गेल्या.
यंदाची नागपंचमी शांततेने पार पडली. नागपंचमी सुरुळीत पार पडावी यासाठी ३०० हून अधिक पोलीस कर्मचारी तनात करण्यात आले होते.आरोग्ययंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली होती.
सर्पदंशावरील एक हजार लसी उपलब्ध ठेवण्यात आल्या होत्या. तातडीच्या उपचारासाठी ७ स्वतंत्र वैद्यकीय पथके तनात होती. न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी वनविभागाच्या वतीने १६७ कर्मचारी तनात करण्यात आले होते.