नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे अवैध धंदे आणि त्यातील पैशाच्या वाटणीवरुन एका तरुणाची हत्या करण्यात आली. शनिवारी रात्री आठ वाजता राजाबाबा बीअर बारसमोर ही घटना घडली असून आकाश पानपत्ते (वय २७) असे या मृत तरुणाचे नाव आहे. आकाश पानपत्ते हा देखील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी होता.

शनिवारी आकाश आणि त्याचे काही मित्र राजाबाबा बीअर बार येथे दारु पिण्यासाठी गेले होते. यादरम्यान गोल आणि सूरज या दोघांमध्ये बारच्या बाहेर वाद झाला. आकाश हा वाद सोडवण्यासाठी बाहेर आला असता सूरजने त्याच्यावर गोळी झाडली. आकाशला वाचवण्यासाठी बाहेर आलेल्या निलेश आणि पवन या दोघांच्या दिशेनेही सूरजने गोळीबार केला. मात्र त्याचा नेम चुकल्याने ते बचावले. घटनेनंतर आरोपीने एका कारमधून पळ काढला. रात्री उशिरा पोलिसांनी या हत्येप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते. आकाश आणि सूरज हे दोघेही कोळसा चोरी व अवैध विक्रीच्या व्यवसायात गुंतले होते. आकाशची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल होता.

खापरखेडा येथे कोळशाच्या खाणी असून या खाणींमध्ये कोळसा चोरी आणि अवैध विक्री करणाऱ्या टोळ्या तयार झाल्या आहेत. या टोळ्यांमध्ये नेहमीच वाद होतात आणि या वादात सर्रास गोळीबार होतो असे सांगितले जाते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यातील पोलिसांच्या कार्यक्षमेतवर प्रश्न उपस्थित होत आहेत.