राजेश्वर ठाकरे, नागपूर

ब्रह्मोसच्या नागपूर केंद्राची स्थापना २०११-१२ च्या सुमारास झाली असून येथे सुखोई विमानाला ब्रह्मोस अग्निबाणासह सज्ज करण्यात  या केंद्राची मोलाची भूमिका आहे.

भारत आणि रशिया यांची संयुक्त कंपनी ‘ब्रह्मोस एअरोस्पेस’ने भारतात २००७ पासून कामाला सुरुवात केली. कंपनीचे उत्पादन केंद्र हैदराबाद, तिरुवनंतपूरम आणि नागपूर येथे आहेत. ब्रह्मोस अग्णिबाणाचे  उत्पादन अधिक व्हावे, असा निर्णय झाल्यावर नागपुरात केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राचे प्रमुख म्हणून कर्नल दर्जाचे अधिकारी नियुक्त करण्यात आले. वर्धा मार्गावरील ८० ते ९० एकर क्षेत्रातील या केंद्राबद्दल कमालीची गोपनियता बाळगण्यात आली. येथे अग्णिबाण निर्मिती होते, याबाबत कधीही कंपनीतर्फे खुलासा करण्यात आला नाही. हे केंद्र डीआरडीओचे आहे असेच माहिती दिली जात होती. कंपनीत संरक्षण संशोधन व विकास संस्थेचा (डीआरडीओ) ५५ टक्के वाटा आहे.

ब्रह्मोस हे आवाजाच्या वेगाने किंबहुना त्यापेक्षा अधिक वेगाने मारणारे अग्णिबाण आहे. भारताने सुपरसॉनिक आणि आता हायपरसॉनिक अग्णिबाण तयार करण्याचे नियोजन केले आहे. अलीकडे सुखोई विमानाला ब्रह्मोस अग्निबाणासह चाचणी घेण्यात आली. यासाठी अग्निबाणाची  रसद नागपूर केंद्रातून मिळाली होती.

‘ब्रह्मोस’ अग्निबाण येत्या काही वर्षांत आवाजापेक्षा सातपट अधिक अर्थात ‘मॅक ७’ इतक्या वेगाने मारा करू शकणार आहे. या कालावधित अग्निबाण हायपरसॉनिक श्रेणीत नेले जाईल. हे लक्ष्य गाठण्यासाठी डीआरडीओ, आयआयटी आणि  इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधील तज्ज्ञ कार्यरत आहेत. सध्या या अग्णिबाणाची मारा करण्याची क्षमता ‘मॅक २.८’ वेगाने आहे.

टप्प्याटप्प्याने वेग वाढवून सध्याच्या ‘सुपरसॉनिक’वरून अधिक वरच्या ‘हायपरसॉनिक’ श्रेणीत नेण्यात येणार आहे.  सध्या ब्रह्मोस हे जगातील सर्वाधिक वेगवान अग्निबाण आहे.

अमेरिकेकडेही ते नाही. असा प्रकारच्या अग्निबाणाच्या निर्मितीसाठी ७० टक्के सुटे भाग खासगी कंपन्यांकडून खरेदी केले  जाते हे विशेष.

‘ब्रह्मोस’ काय आहे

* ब्रह्मोस हे रडारवर न येणारे सुपरसॉनिक क्रुझ मिसाईल आहे. ते पाणबुडीतून, जहाजातून, विमानातून किंवा जमिनीवरूनही डागता येऊ  शकते.

* सुखोई—३० एमकेआय या विमातून ब्रह्मोस मारा करू शकते. सुखोई-ब्रह्मोस हे एकत्र आल्याने भारताच्या शक्तीत प्रचंड वाढ झाली आहे. हे अग्निबाण २९० किलोमीटर अंतरापर्यंतच लक्ष्य भेदू शकते. तसेच ३०० किलो युद्धसामग्री वाहून नेण्याची क्षमता  त्यात आहे.

दोन नद्यांचे आद्याक्षर

‘ब्रह्मोस’ हे भारतातील ब्रह्मपुत्रा व रशियातील ‘मस्क्वा’ या नद्यांच्या नावाच्या अद्याक्षरांवरून ठेवण्यात आले आहे.