करोना काळात कर्तव्यात कसूर करणाऱ्या नऊ कर्मचाऱ्यांना नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तडकाफडकी निलंबित केले. यामध्ये पाच सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

मुंढे यांनी शुक्रवारी सकाळी ६ वाजताच महापालिका मुख्यालय आणि सफाई कर्मचारी हजेरी लावत असलेल्या विभागाला आकस्मिक भेट दिली. मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागूनच करोना नियंत्रण कक्ष आहे. हा कक्ष २४ तास सुरू असतो. रात्री काम देण्यात आलेले चार कर्मचारी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पडत नसल्याचे निर्दशनास आले. कर्तव्यात कसूर केलेल्या किशोर कहाते, मनोज तांगडे, प्रशांत डाहाळ, सुनील लोहकरे यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

आयुक्तांनी पाचपावली, इंदोरा, धरमपेठ हजेरी शेडला भेट दिली. आशीनगर झोन क्रमांक ९ चे स्वच्छता निरीक्षक संजय पोटे, आशिक बनसोड, धरमपेठ झोनचे प्रभारी झोनल आरोग्य अधिकारी जयवंत जाधव, नेहरूनगर झोन क्रमांक ५ चे राजेंद्र सोनटक्के आणि मंगळवारी झोन क्रमांक १० चे दिनेश करोसिया यांना निलंबित केले.

नागपुरात जनता कर्फ्यूची घोषणा :

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागपुरात जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. २५ आणि २६ जुलै असे दोन दिवस हा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची महापालिकेत बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे संघर्षानंतर पहिल्यांदाच महापौर संदीप जोशी आणि महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे एकत्र आल्याचं पहायला मिळालं. पत्रकारांशी बोलताना त्यांनी जनता कर्फ्यू जाहीर केला.