चंद्रपूरमधील ब्रह्मपुरीजवळ कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. प्रवीण ठाकूर असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्यावर ट्रॅक्टरचे कर्ज होते. या घटनेने शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

ब्रह्मपुरीतील कोथुळना येथे बुधवारी पहाटे चारच्या सुमारास प्रवीण ठाकूर या शेतकऱ्याने शेतातील झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रवीण ठाकूर यांची दोन एकरच्या जागेवर शेती असून शेतातील पिकांना रोगाने ग्रासले होते. यामुळे त्यांचे नुकसान होण्याची शक्यता होती. डोक्यावर ट्रॅक्टरचे कर्ज आणि शेतात झालेले नुकसान यामुळे ठाकूर यांनी आत्महत्या केली, असे समजते. ठाकूर यांना दोन लहान मुलं आणि एक भाऊ आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांची भेट घेत ठाकूर कुटुंबीयांना मदत करण्याची मागणी केली.

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने कर्जमाफी योजना आणली असली तरी अद्याप शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमधील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर आता तरी राज्य सरकारला जाग येणार का असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.