मंगेश राऊत, नागपूर

राज्यात अमली पदार्थ सेवनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, मोठय़ा प्रमाणात तरुणाई व्यसनाधीन होत आहे. यावर प्रतिबंध तसेच तस्करीला आळा घालण्यासाठी राज्यात स्वतंत्र अमली पदार्थ विभागही कार्यरत आहे. मात्र, काही शहरांचा अपवाद सोडला तर इतरत्र त्याविरुद्ध मोठी कारवाई होताना दिसत नाही. राज्यात ठाणे आणि नागपूर पोलिसांनी अमली पदार्थाच्या तस्करीविरुद्ध ठोस मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईच्या आकडेवारीवरून ठाण्यानंतर नागपूरचा क्रमांक लागतो.

अमली पदार्थाचे सेवन मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. शहर छोटे असो, वा मोठे अमली पदार्थाची विक्री आणि त्याअनुषंगाने होणारी तस्करी ही मोठी समस्या ठरली आहे. नागपुरातही गांजा, चरस, ब्राऊन शुगर, कोकेन, एमडी आदी अमली पदार्थाचा विळखा वाढत आहे. एकीकडे तरुण मोठय़ा प्रमाणात व्यसनाधीन होत असून दुसरीकडे अमली पदार्थाच्या तस्करीवर नियंत्रण मिळवणे व या क्षेत्रातील आरोपींवर कारवाई करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर काही दिवसांतच तस्कर जामिनावर कारागृहाबाहेर येतात व पुन्हा सक्रिय होतात. त्यामुळे त्यांना चाप लावण्यासाठी नागपूर पोलिसांनी नवीन प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. एमपीडीए, मोक्का तडीपार आदी कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाया करून कुख्यात गुन्हेगारांना कारागृहात डांबण्यात येते. नागपूर पोलीस प्रथमच अशा प्रकारची कारवाई करणार असून, या संदर्भात दोन तस्करांच्या विरोधात प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. या दोन्ही तस्करांविरुद्ध ब्राऊन शुगर तस्करीचे ७ ते ८ गुन्हे दाखल आहेत.

संपूर्ण राज्याचा विचार केला तर २०१७ मध्ये नागपूर पोलिसांनी सर्वाधिक १६३ गुन्हे दाखल केले, तर ठाणे पोलिसांनी १३० गुन्हे दाखल केले होते. यंदा जानेवारी ते ऑगस्टपर्यंत ठाणे पोलिसांनी ११२ गुन्हे दाखल केले. दुसऱ्या क्रमांकावर नागपूर पोलीस असून ५२ गुन्हे दाखल केले. ठाणे पोलिसांच्या कारवाईमध्ये अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचाही समावेश आहे, हे विशेष.

तस्करांची संपत्ती जप्त करण्यावर भर

अमली पदार्थ तस्करांवर कारवाई केल्यानंतर काही दिवसांनी ते जामिनावर सुटतात व पुन्हा याच व्यवसायात सक्रिय होतात. त्यामुळे अमली पदार्थ विकणे व तस्करीच्या गुन्ह्य़ांची पाश्र्वभूमी असणाऱ्यांचा इतिहास तपासून त्यांची संपत्ती जप्त करण्यावर भर दिला जात आहे. तसे प्रस्ताव तयार करून ते राज्य सरकारकडे पाठवण्यात येत आहेत.

-संभाजी कदम, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा.

आयुक्तालयनिहाय कारवाई

आयुक्तालय     २०१७                      २०१८

मुंबई                 ६८                             ४१

ठाणे                 १३०                          ११२

पुणे                    ५६                             ४०

नागपूर              १६३                           ५२