नोटाबंदीच्या निर्णयामुळे नागपूरमध्ये ५८ वर्षीय अनंत बापट यांनी आत्महत्या केली आहे. नोटाबंदीमुळे वडिलांना त्रास होत होता असा आरोप बापट यांच्या मुलाने केला आहे.

सावनेरमध्ये राहणारे ५८ वर्षीय अनंत बापट यांनी रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलगा घरातून बाहेर गेला असताना बापट यांनी आत्महत्या केली होती. बापट यांनी सुसाईड नोटमध्ये पाचशे आणि हजारच्या नोटा बंद झाल्यामुळे त्रास होत असल्याचे म्हटले होते. या आधारे त्यांच्या मुलाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.  अनंत बापट हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी रोखपाल असून सेवानिवृत्तीनंतर त्यांनी शेती उपयोगी यंत्र आणि पाईपचा व्यवसाय सुरु केला होता. पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द झाल्याने बापट यांचे व्यवसायात नुकसान झाले होते. यामुळे निराश होऊ त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे.

नोटाबंदीच्या निर्णयामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा आता ६० वर पोहोचला आहे. नोटाबंदीमुळे आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याच्या घटना सर्वाधिक आहेत. तर बँकेत रांगेत उभे असताना ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्यांचे प्रमाणही सर्वाधिक आहे. तर नवीन नोटा नसल्याने रुग्णालयाने उपचार करण्यास नकार दिल्याने मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. रविवारी पुण्यात हृदयाचा गंभीर आजार असलेल्या बाळाची वेळेवर शस्त्रक्रिया न झाल्याने बाळाचा मृत्यू झाला. नोटाबंदीच्या पाश्र्वभूमीवर ‘रुबी हॉल’ रुग्णालयाने पैशांसाठी अडवणूक केली, तसेच धनादेशही स्वीकारला नाही, असा आरोप या बाळाच्या नातेवाईकांनी केला होता. त्यामुळे नोटाबंदीचा हा निर्णय आता सर्वसामान्यांच्या जीवावर बेतू लागल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.