नागपूर- मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे नऊ डबे रुळावरुन घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. लांब पल्ल्याच्या गाड्या कल्याण- पनवेल- लोणावळा- पुणे- दौंडमार्गे मनमाडला वळवण्यात आल्या असून कसाऱ्याहून कल्याणकडे येणाऱ्या लोकल ट्रेनची वाहतूक ठप्प झाली. या मार्गावर सध्या टिटवाळापर्यंतच लोकल ट्रेनची वाहतूक सुरु आहे.

मंगळवारी सकाळी नागपूर- मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे नऊ डबे आसनगाव- वाशिंददरम्यान रुळावरुन घसरले. या अपघातात जीवितहानी झालेली नाही. मात्र या अपघाताचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. घटनास्थळी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरु असून काम पूर्ण होण्यासाठी सात ते आठ तास लागण्याची शक्यता आहे. या कालावधीत लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक कल्याण- पनवेल- लोणावळा- पुणे- दौंडमार्गे मनमाड या मार्गावर वळवण्यात आली आहे. तर मनमाड- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. १२१४० नागपूर -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस ही ट्रेन नाशिक रोडपर्यंत धावेल. तिथून ही ट्रेन पुन्हा नागपूरसाठी रवाना होईल. तसेच १२०७२ जालना- दादर जनशताब्दी एक्स्प्रेस मनमाडपर्यंतच धावणार असून तिथून ही ट्रेन पुन्हा जालनासाठी रवाना होईल. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गातील आणि वेळापत्रकातील बदल हे फक्त मंगळवारसाठी लागू असतील.

या एक्स्प्रेसचे मार्ग बदलले
१७६१७- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नांदेड तपोवन एक्स्प्रेस
१२३३६ – लोकमान्य टिळक टर्मिनस भागलपूर एक्स्प्रेस
१२५३४ – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – लखनौ पुष्पक एक्स्प्रेस
१५०१७ – लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर एक्स्प्रेस (व्हाया अलाहाबाद)
१२८५९- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गीतांजली एक्स्प्रेस
११०२५ – भुसावळ- पुणे एक्स्प्रेस मनमाड-दौंडमार्गावरुन धावेल, या एक्स्प्रेसचा शेवटचा थांबा पुण्याऐवजी दौंड असेल.
२२१२९ – लोकमान्य टिळक टर्मिनस – अलाहाबाद तुलसी एक्स्प्रेस
१२१३८ – फिरोजपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पंजाब मेल

या गाड्या इगतपूरीपर्यंत धावणार
२२१०२ – मनमाड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्यराणी एक्स्प्रेस
१२११० – मनमाड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पंचवटी एक्स्प्रेस

लोकल सेवा ठप्प
अपघाताचा फटका लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही बसला. मंगळवारी सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांना लोकल ट्रेन नसल्याने मनस्तापाचा सामना करावा लागला. कसाऱ्याहून टिटवाळापर्यंतची वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली आहे. सध्या या मार्गावर लोकल ट्रेनची वाहतूक टिटवाळापर्यंतच सुरु आहे.