नागपूर : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी आमदार उपराजधानीत असताना विमान वाहतूक कंपन्या भरमसाठ प्रवास भाडे वाढवून अक्षरश जनतेच्या पैशाची लुट करीत आहे. नागपूर ते मुंबईचे विमान भाडे ३० हजार रुपये करण्यात आले आहे. एमआयएमचे  इम्तियाज जलील यांनी आज  विधान सभेत हा मुद्या उपस्थित केला.

विदर्भाचा फायदा व्हावा म्हणून विधिमंडळाचे अधिवेशन नागपुरात घेण्यात येते. परंतु या अधिवेशनाचा विदर्भाला किती फायदा होतो. हा वादाचा विषय आहे. मात्र या अधिवेशनाचा विमान वाहतूक कंपन्यांना नक्कीच फायदा होत आहे. अधिवेशनाला शनिवार आणि रविवारी सुटी असल्याने आमदार त्यांच्या मतदार संघात परत जातात. ही बाब हेरून विमान वाहतूक कंपन्या  प्रवास भाडय़ात ५ ते ६ हजार रुपयांवरून २५ ते ३० हजारांपर्यंत वाढ करतात. चित्रपट गृहाचे तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्यांना शासन केले जाते तर मग अशा तिकीटाचे दर अव्वाच्या सव्वा आकारणाऱ्या विमान कंपन्याविरुद्ध कारवाई का केली जात नाही, असा सवालही त्यांनी केला.

आमदारांना प्रवास भत्ता मिळत असल्याने या काळाबाजाराबाबत फारसे त्याबाबत गंभीर नसतात, परंतु शेवटी हा पैसा जनतेचा आहे. अशा प्रकारे तिकीटांचे दर भरमसाठ वाढून लुट करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी. तसेच सरकारने या विमान वाहतूक कंपन्यांना पत्र लिहून नागपूर ते मुंबई आणि नागपूर ते पुणे विमानाचे भाडे समान ठेवण्यास सांगावे, अशी मागणी केली.