नागपूर महानगपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी जोमानं कामाला सुरूवात केली आहे. तुकाराम मुंढे यांनी रूजू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लेखा आणि वित्त विभागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी या विभागात कार्यरत असलेल्या चार कर्मचाऱ्यांना दणका देत कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत. आपल्या कामात अनियमितता केल्याचा ठपका या कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.

दुसऱ्या दिवशीही तुकाराम मुंढे सकाळी आपल्या वेळेवर कार्यालयात दाखल झाले. दुसऱ्या दिवशी त्यांनी तब्बल सहा बैठका घेत कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मनपाच्या आर्थिक स्थितीची आणि अन्य कामांचीही माहिती घेतली. तुकाराम मुंढे यांनी नागपूर महानगरपालिका क्षेत्रातही जनेतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार सुरू केला. तसंच त्यांनी जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या.

तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. यापूर्वी ते एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर होते. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने त्यांची एडस नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर नियुक्ती केली होती. तुकाराम मुंढे हे नागपूर महानगरपालिकेत येणार हे कळल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी धसका घेतला होता. तसंच अनेक कर्मचारी वेळेपूर्वी कार्यालयात हजर राहत असल्याचंही समोर आलं होतं.

कशी आहे मुंढेंची कार्यपद्धती ?
आता त्यांची भाजपाची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे नागपूरचेच असून त्यांना अडचणीत आणण्यासाठी उद्धव सरकारने ही खेळी खेळल्याचे बोलले जाते. तुकाराम मुंढे हे नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी कधीही नियमबाह्य गोष्टींना थारा दिलेला नाही. त्यामुळेच राजकरण्यांना ते नेहमीच खुपतात.

सर्वपक्षीय राजकारणी तुकाराम मुंढे यांच्याविरोधात एकत्र का येतात?
आतापर्यंत महाराष्ट्राच्या वेगवेगळया भागांमध्ये त्यांची बदली झाली असून, त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाची छाप उमटवली आहे. नियमबाह्य, अनधिकृत बांधकामांना अभय देण्याच्या मुद्दावरुन त्यांचा नेहमीच राजकारण्यांबरोबर संघर्ष झाला आहे. नाशिक असो किंवा नवी मुंबई महापालिका नेहमीच सर्वपक्षीय राजकारणी त्यांच्याविरोधात एकत्र आल्याचे दिसले आहे.