आपलं काम जमत नसेल तर घरी जा असा इशारा नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी डॉक्टरांना दिला. करोनाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुढें यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांची शाळा घेतली. नागपूर महानगरपालिकेचे अवस्था पाहून त्यांना संताप आल्यानं त्यांनी या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद दिली.

नागपूर महानगरपालिकेचं सर्वात चांगलं असणारं रूग्णालय आज उकिरड्यासारखं झालं आहे. असे प्रकार कदापी खपवून घेतले जाणार नाही, असं म्हणत मुढे यांनी सर्वांना सक्त ताकीद दिली. महानगपालिकेचे डॉक्टर्स योग्यरित्या आपली प्रॅक्टिस करत नाही. ज्यांना काम जमत नसेल त्यांनी घरी जावं, असं ते यावेळी म्हणाले. दरम्यान, करोनाविरूद्ध लढण्यासाठी आरोग्य विभागानं सज्ज राहावं, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. तसंच प्रशासनातली गोपनीय माहिती बाहेर पडत असल्याबाबत त्यांनी नाराजीही व्यक्त केली.

यापूर्वीही काही दिवसांपूर्वी तुकाराम मुढे यांनी माध्यमांशी संवाद साधताना नागरिकांनी लॉकडाउनच्या निर्णयाचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलं होतं. या ठिकाणी करोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंताजनक आहे. लॉकडाउनचं पालन योग्यरित्या होत नसल्यानं प्रशासनाच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. नागरिकांनी लॉकडाउनच्या निर्णयाचं पालन न केल्यास गंभीर परिस्थितीला सामोरं जावं लागेल. असा इशाराही त्यांनी दिला होता. याव्यतिरिक्त लॉकडाउन दरम्यान जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्यासाठी पालिकेनं सुविधाही सुरू केली आहे.