विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीसला पात्र नसतानाही लसीचा दुसरा डोस मिळाल्याने सध्या वाद निर्माण झाला आहे. एकीकडे लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक लसीकरण केंद्र बंद असून सर्वसामान्यांना सुविधा मिळत नसताना तन्मय फडणवीसला लस कशी मिळाली असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान तन्मय फडणवीसला लसीचा डोस देणाऱ्या नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटने यासंबंधी स्पष्टीकरण दिलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

पुतण्याने लस घेतल्याने झालेल्या वादावर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण; म्हणाले…

तन्मय फडणवीसने नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये (NCI) लसीचा दुसरा डोस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. वाद झाल्यानंतर त्याने ही पोस्ट डिलीट केली. दरम्यान नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालक शैलेश जोगळेकर यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं आहे की, “तन्मय फडणवीसने आमच्याकडे लसीचा दुसरा डोस घेतला. मुंबईमधील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्याने पहिला डोस घेतला होता. त्याला कोणत्या निकषाद्वारे पहिला डोस देण्यात आला याची कल्पना नाही. त्याने आम्हाला प्रमाणपत्र दाखवल्यानंतर आम्ही आमच्या सेंटरमध्ये दुसरा डोस दिला”.

“…तर मग तन्मय फडणवीसला लस दिलीच कशी काय गेली?”

फडणवीसांचं स्पष्टीकरण
देवेंद्र फडणवीस यांनी करोना लसीकरणासाठी असणाऱ्या नियमांचं पालन केलं पाहिजे याबाबत दुमत नसून कोणालाही चुकीच्या पद्धतीने ते करण्याची परवानगी देता कामा नये असं म्हटलं आहे.

तन्मय फडणवीसच्या फोटोवरुन झालेल्या वादावर स्पष्टीकरण देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, ”तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही. जर हे नियमानुसार झालं असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण जर नियमावलीचं उल्लंघन झालं तर हे अगदी अयोग्य आहे. पात्र नसल्याने माझ्या पत्नी आणि मुलीलाही लस मिळालेली नाही. प्रत्येकाने नियमांचं पालन केलं पाहिजे हे माझं ठाम मत आहे”.