गेल्या आठवड्यात ६ जुलै रोजी नागपुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे विधानभवन जलमय झाले होते. यामुळे विधीमंडळाचे कामकाज त्या दिवशी होऊ शकले नाही. तोच धागा पकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे तुंबलेले पाणी पाहतानाचा फोटो माध्यमांत प्रसिद्ध झाला आहे. हे अत्यंत चुकीचे असून हा सभागृहाचा अवमान असल्याचे पवार यांनी म्हटले. यावर बागडे हे चिडले आणि त्यांनी आपत्कालीन परिस्थिती धावून जाणे हे काम असल्याचे म्हटले. यावर पवार यांनी सावध पवित्रा घेत मला तसं म्हणायचं नव्हतं… पण अध्यक्ष महोदय तुम्ही वाकून बघताय.. पण दुसऱ्यांनी झाकून ठेवायची गरज नव्हती, असे म्हणत त्यांनी भाजपाला टोला लगावला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणी नागपूरकरांची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याची सुरूवात ६ जुलैच्या पावसावरूनच झाली. पवार म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस हे तरूण वयात नागपूरचे महापौर होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रस्त्यांसाठी कोट्यवधी रूपये खर्च करत आहेत. तरीही नागपुरात जलमय स्थिती होते. हा प्रकार बरोबर नाही.. ही जबाबदारी कोणाची असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी नागपूरकरांची जाहीर माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.

वाईट कामामुळे संपूर्ण दिवस वाया गेला. नागरिकांच्या कररूपी पैशातून हे कामकाज होते. तो सर्व पैसा वाया गेला. याला जबाबदार असलेल्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच कुणाच्या हट्टामुळे नागपुरात अधिवेशन घेतले, असा सवाल उपस्थित करत अधिकारी पगार घेतात, ते फुकट काम करत नाहीत. त्यामुळे दोषींवर कारवाई करावी, असेही ते म्हणाले.