नाणार प्रकल्पला जोरदार विरोध करत आज विरोधकांनी अधिवेशनात गदारोळ घातला. सत्ताधारी पक्षातील शिवसेना आणि विरोधी पक्षातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभागृहात नाणारला विरोध करत जोरदार घोषणाबाजी केली. नाणार प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका पुन्हा एकदा शिवसेनेने घेतली आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी नाणारसोबत समुद्रही घेऊन जा असा खोचक सल्ला भाजपाला दिला. पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे. यात गदारोळाच्या वातावरणातच प्रश्नत्तोरचा तास सुरू झाला. मात्र अध्यक्ष आणि सत्ताधारी आमदार बोलत असतानाही विरोधकांची घोषणाबाजी सुरूच होती.

बुधवारीच नाणारवरून विधानसभेत विरोधी पक्षासह शिवसेनेने गोंधळ घातला होता. त्या गोंधळात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. गोंधळामुळे कामकाज करणे शक्य नसल्याने विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. त्यात आजही याच गोंधळाचा दुसरा अंक सभागृहात पाहायला मिळाला. नाणार प्रकल्पाचा विषय पटलावर येताच शिवसेनेसह विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला.

दरम्यान नाणारवासीय बुधवारी नागपुरात आले, विधानभवनाबाहेर त्यांनी आंदोलनही केले. शिवसेनेने तर कितीही वेळा निलंबित करा आमचा नाणारला विरोध कायम राहिल अशी आक्रमक भूमिका घेतली. नाणार प्रकल्प रद्द करा आणि कोकणचा ऱ्हास थांबवा अशी घोषणाबाजी सभागृहात करण्यात आली.