News Flash

“…असले वाद आपली रडकथा प्रभावी करण्यासाठी फारच उपयुक्त असतात”

अहंकार खाली पाहू देत नाही आणि खाली पाहिल्याशिवाय आत्मपरीक्षण करता येत नाही.

गोपीनाथ गडावर गुरूवारी पंकजा मुंडे यांचा मेळावा पार पडला. यावेळी मेळाव्याला भाजपाच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी पंकजा मुंडे आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बोलताना आपली नाराजी व्यक्त केली होती. यावरून पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी बहुजनवाद काढलाच. हे असले वाद, आपली रडकथा प्रभावी करण्यासाठी फारच उपयुक्त असतात, असा आरोप यावेळी करण्यात आला आहे. नागपूर तरूण भारतच्या संपादकीयमधून मुंडे आणि खडसे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. एकनाथ खडसे यांची मुलगी व पंकजा मुंडे निवडून आल्या असत्या आणि एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले असते, तर मग भाजपा बहुजनांचा पक्ष झाला असता का? आता यापैकी काहीच नाही, तर तो एकदम ‘मूठभर’ लोकांचा झाला का? वस्तुस्थिती ही आहे की, या दोघांनाही विस्थापित करणारे जे नेतृत्व उभे झाले आहे तेही बहुजन समाजाचेच आहे, हे यांच्या लक्षातच येत नाही. काळ वेगाने बदलत आहे. मतदारांची मानसिकता, आशा-अपेक्षा खूप बदलत चालल्या आहेत. याची जाण या दोघांनाही नाही, असेच दिसून येते. काळाची ही बदलती पावले यांनी ओळखली नाही, म्हणून त्यांची ही अशी अवस्था झाली आहे, असंही यात नमूद करण्यात आलं आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात ?
महाराष्ट्रातील भाजपाच्या बाबतीत पक्षनिष्ठेच्या संदर्भात बोलायचे झाल्यास तीन ‘राम’ आठवतात. आजही त्यांचीच उदाहरणे दिली जातात. राम म्हाळगी, राम कापसे आणि राम नाईक. या तीन ‘रामां’च्या मध्ये एका ‘नाथा’लाही स्थान देण्यास भाग पाडणारी संधी खडसेसाहेबांनी गमाविली, असेच म्हणावे लागेल. अन्याय कुणावर होत नाही? पक्ष चालविताना वरिष्ठांना बरेचदा असे निर्णय घ्यावे लागतात की, त्याने कुणावर तरी अन्याय होणार असतो. नाथाभाऊ तर पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात वावरले आहेत. आपल्यामुळे कुणावरही अन्याय झाला नाही, कुणीही दुखावले गेले नाही, पक्षातील कुणाचीही गळचेपी झाली नाही, असे नाथाभाऊ तरी छातीठोकपणे सांगू शकतील का? परंतु, या सर्व गोष्टी आत्मपरीक्षण केले, तरच लक्षात येतात. अन्यथा, दुसर्‍यांना दोष देण्याचीच मानसिकता असेल, तर मग गोष्टच वेगळी.

अहंकार खाली पाहू देत नाही आणि खाली पाहिल्याशिवाय आत्मपरीक्षण करता येत नाही. कारण, अहंकारी व्यक्तीला समोरच्याचेच दोष दिसतात. त्यामुळे स्वत:चे काही चुकले का, स्वत:त काही कमतरता राहिली का, हे बघण्यासाठी संधीच मिळत नाही. गुरुवारी, परळीजवळील गोपीनाथ गडावर, गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात, पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी जे मनोगत व्यक्त केले, त्यात या दोघांनी आपल्या सद्य:स्थितीचे परीक्षण केल्याचे अजीबात जाणवले नाही.

आपण कुणाला काय दिले, कुणासाठी काय काय केले, हे आपण आपल्या तोंडाने सांगायचे नसते, अगदी राजकारणातही. उलट, ते लोकांना सांगावेसे वाटले पाहिजे आणि आपण, पक्षाने मला किती दिले, याचीच सतत जाहीर उजळणी करायची असते. हा विधिनिषेध सर्वसामान्य कार्यकर्त्याने पाळला नाही तर एकवेळ चालून जाते. परंतु, जेव्हा आपण स्वत:ला ‘लोकांच्या मनातील मुख्यमंत्री’ असे नामाभिधान लावून घेतो किंवा ‘मुंडेसाहेब असते तर मीच मुख्यमंत्री झालो असतो’ असे आत्ममुग्ध विधान करतो, तेव्हा तर हा विधिनिषेध कटाक्षाने पाळायचा असतो. अगदी आजच्या प्रचलित भाषेत बोलायचे, तर या मेळाव्यात पंकजा मुंडे व नाथाभाऊ जे काही बोलले, ते ‘पोलिटिकली इन्करेक्ट’ (राजकीयदृष्ट्या अयोग्य) असेच होते.

या दोघांच्या भाषणावरून एक स्पष्ट झाले की, नाथाभाऊ भाजपा सोडण्याच्या मन:स्थितीत आले आहेत. त्याचे स्पष्ट संकेत त्यांनी आपल्या भाषणातून दिलेत. पंकजा मुंडे यांनीही तसे मन बनविले असण्याची शक्यता आहे. कारण, त्या म्हणाल्या की, मी पक्ष सोडणार नाही. पक्षाने मला सोडायचे असेल तर तसे करावे. याचा अर्थ काय, हे सामान्य लोकांना समजले नसेल तरी आपण ज्यांना नेता मानतो ती माणसे, एका साध्या पराभवाने किती सैरभैर होतात, याचे दिग्दर्शन मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या मेळाव्यात झाले. विरोधकांना तर आनंदाच्या उकळ्या फुटत असतील आणि त्या अस्वाभाविकही नाही. परंतु, भाजपाचे जे कार्यकर्ते आहेत, जे समर्थक आहेत, त्यांचे मन मात्र चरकल्याशिवाय राहिले नसेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 8:22 am

Web Title: nagpur tarun bharat editorial criticize pankaja munde eknath khadse gopinathgadh melawa jud 87
Next Stories
1 तुम्ही व्यापारी असाल तुमच्या घरचे, जीएसटीवरून शिवसेनेचा केंद्र सरकारवर निशाणा
2 कापसातील ओलाव्यामुळे उत्पादकांसमोर अडचणी
3 पंकजा यांच्या शक्तिप्रदर्शनातून फडणवीस लक्ष्य!
Just Now!
X