नागपूरमधील कोराडी पोलीस ठाण्याच्या एका वाहनात ‘टिक-टॉक’ व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित करणारा कुख्यात गुंड मोबीन अहमद समसुददीन अहमद (वय ३०) हा बुधवारी यशोधरानगर पोलिसांना शरण आला. त्याला अटक करून कोराडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले, अशी माहिती पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांनी दिली.

मोबीन याने कोराडी पोलीस ठाण्यासमोर पोलिसांच्या वाहनात व्हिडिओ तयार करून तो व्हायरल केला. या व्हिडिओमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली होती. पोलिसांनी त्याचा कसून शोध सुरू केला होता. पोलीस शोध घेत असल्याचे कळताच  बुधवारी तो पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या कार्यालयात शरण आला. त्याच्याविरुद्ध शहरातील विविध पोलीस ठाण्यात एकूण १३ गुन्हे दाखल आहेत. त्याशिवाय यवतमाळ जिल्ह्यात दोन खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल असून त्यात तो फरार होता. तसेच मध्यप्रदेश, छत्तीसगड व आंध्रप्रदेशातही त्याच्यावर विविध गुन्हे असल्याची माहिती आहे. मार्च महिन्यात त्याला तडीपार करण्यात आले. पोलिसांच्या वाहनात त्याने काढलेला व्हिडिओ हा ४ फेब्रुवारीचा आहे. ज्या वाहनात त्याने व्हिडीओ काढला त्या वाहनात तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचीही सहायक पोलीस आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येत आहे. लवकरच या प्रकरणचा अहवाल सादर होईल. त्यानंतर संबंधित पोलीस नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही पोद्दार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला यशोधराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायण्णावार उपस्थित होते.

गोवंश तस्करीसाठी कुख्यात

मोबीन हा गोवंश तस्करीसाठी कुख्यात आहे. त्याच्या चामा टोळीत नऊ  जणांचा समावेश असून, ही टोळी मध्यप्रदेश व छत्तीसगडमध्ये गाय व जनावरांची चोरी करून तस्करी करते. या तस्करीसाठी चोरी व भाडय़ाच्या वाहनांचा उपयोग करते. गोवंश तस्करी करताना त्याने वणीसह दोन पोलीस  ठाण्यांतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला आहे. त्या दोन्ही प्रकरणी तो फरार होता. त्याची अनेक वाहने मध्यप्रदेश, छत्तीसगढ व तेलंगणा राज्यात जप्त आहेत.