महिनाभर विस्थापनविरोधी आंदोलन करण्याचे आवाहन

वणवा लागलेले क्षेत्र मोजण्यासाठी जंगलात गेलेल्या तीन वनरक्षकांना नक्षलवाद्यांनी काल, बुधवारी बेदम मारहाण केल्याने वनाधिकारी व कर्मचारी चांगलेच धास्तावले आहेत. त्यानंतर आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील गुंडेराजवळ नक्षलवाद्यांनी झाडे तोडून रस्त्यावर आडवी टाकून बॅनर बांधल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. नक्षलवाद्यांनी १ ते ३१ मे पर्यंत महिनाभर विस्थापनविरोधी आंदोलन तीव्र करण्याचे आवाहन केले आहे.

सी.जी.गुरनुले, डी. एम. देवकर्ते व आर.डी. हिचामी हे तीन वनरक्षक भामरागड वनपरिक्षेत्रातील जंगलात वणव्याचे क्षेत्र मोजण्यासाठी गेले होते. त्यांची  नक्षलवाद्यांशी गाठ पडली. नक्षल्यांनी सर्वप्रथम वनरक्षकांकडील मोबाईल हिसकावून त्यातील डाटा नष्ट केला व मोबाईल परत दिले, तसेच तिघांनाही बेदम मारहाण करून जंगलात कामे न करण्याचा दम दिला. याची माहिती मिळताच सहायक वनसंरक्षक एम. एम. पचारे यांनी सहकारी कर्मचाऱ्यांसह भामरागडला जाऊन या वनरक्षकांना भेटले.

एटापल्ली तालुक्यातील सूरजागड पहाडावरून लोहखनिज उत्खननास नक्षलवाद्यांनी प्रखर विरोध दर्शविला आहे. या पाश्र्वभूमीवर १ ते ३१ मे पर्यंत विस्थापनविरोधी जनआंदोलन तीव्र करण्याचे आवाहन नक्षलवाद्यांनी पत्रके व बॅनरमधून केले आहे, त्यामुळे नक्षलवादी आपल्या कारवाया आणखी तीव्र करतील, अशी चिन्हे असून वनकर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

कालेश्वरम-मेडीगट्टा सिंचन प्रकल्प व सूरजागड लोह प्रकल्पावरून या जिल्ह्य़ात चांगलीच धुमश्चक्री उडाली आहे. एकीकडे राजकीय नेते, तर दुसरीकडे स्थानिक आदिवासींनी आंदोलन तीव्र केले आहे. या दोन्ही विषयांवर आजवर नक्षलवादी गप्प होते. मात्र, काल प्रथमच त्यांनी आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील गुंडेराजवळ झाडे तोडून रस्त्यावर टाकून मार्ग अडवून धरला. यावेळी रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना बॅनर बांधल्याचे दिसले.