नालासोपारा आणि पुण्यात तीन संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांवर कारवाई केली असतानाच काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी धक्कादायक दावा केला आहे. येत्या बकरी ईदला राज्यातील धार्मिक स्थळांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा कट्टरतावाद्यांचा कट होता, असा दावा त्यांनी केला आहे. आता तरी राज्य सरकार सनातन आणि हिंदू जनजागृती समितीसारख्या विघातक संघटनांवर बंदी घालण्यासंदर्भात केंद्राकडे मागणी करणार का?, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नालासोपारा आणि पुण्यातून तीन संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांना गुरुवारी रात्री उशिरा अटक केली. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांनी शुक्रवारी सनातन आणि हिंदू जनजागृती समितीवर गंभीर आरोप केले. ‘येत्या बकरी ईदला राज्यातील धार्मिक स्थळांमध्ये बॉम्बस्फोट घडवणे तसेच धार्मिक दंगली घडवण्याचा कट असल्याचे नालासोपारात सापडलेल्या स्फोटकांमुळे स्पष्ट होते. पोलिसांनी अटक केलेल्या वैभव राऊतवर पूर्वीपासून दंगलींचे गुन्हे दाखल आहेत. नेमका त्याच्याकडे बॉम्बचा साठा सापडणे आणि त्याच्या बचावार्थ हिंदू जनजागृती समितीने हा ‘मालेगाव पार्ट- २’ असल्याचे जाहीर करणे, यावरुन धार्मिक स्थळांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचे कारस्थान शिजत असल्याचे संकेत मिळतात, असे विखे पाटील यांनी म्हटले आहे.

खबरदारीचा उपाय आणि भविष्यातील अप्रिय घटना टाळण्यासाठी सर्वच कट्टरतावादी संघटनांवर तातडीने बंदी घालण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अधिक वेळ न दवडता आणि उदासीन दृष्टीकोन सोडून अशा संघटनांवर बंदी घालण्यासंदर्भात राज्यातील भाजपा सरकार केंद्राशी बोलणी करणार का?, असा सवाल त्यांनी विचारला. येत्या २० ऑगस्टला डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा पाचवा स्मृतीदिन असून, सनातन आणि हिंदू जनजागृती समितीसारख्या संघटनांवर बंदी घालणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरू शकेल, असे त्यांनी सांगितले.