कार्यक्रमाची वसईत प्रचंड उत्सुकता; मान्यवरांची उपस्थिती

आषाढी एकादशीनिमित्त ‘लोकसत्ता’ आयोजित ‘नामरंगी रंगले’ या ‘भक्तिगीतां’च्या सुरेल मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, १३ जुलै रोजी वसईच्या पारनाका येथील भंडारी सभागृहात संध्याकाळी साडेसहा वाजता  ही मैफल रंगणार आहे. या कार्यक्रमामुळे वसईत भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून या कार्यक्रमाची मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून कार्यक्रमाच्या प्रवेशिका शनिवार सकाळपासून सभागृहात उपलब्ध होणार आहेत.

आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते. आषाढी एकादशी हा दिवस महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत पोहोचलेला सांस्कृतिक वारसा. विठ्ठलाच्या भक्तीत दंग झालेले वारकरी एकतारी व टाळ, झांजांच्या तालावर तुकोबा, ज्ञानेश्वरांचे अभंग गात ही पालखी पंढरपूपर्यंत चालत नेतात.  सारे वातावरण भक्तीमय झालेले आहे. याच भक्तीमय वातावरणात आषाढीचे एकादशीचे निमित्त साधून ‘लोकसत्ता’तर्फे ‘नामरंगी रंगले’ या सुरेल भक्तिगीतांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, १३ जुलै रोजी वसईच्या पारनाका येथील एस. के. भंडारी समाजाच्या सभागृहात ही भक्तिगीतांची मैफल रंगणार आहे. सुप्रसिद्ध गायक संजीव चिम्मलगी आणि ‘लिटिल चॅम्पियन्स’मधून घराघरात पोहोचलेली गायिका मुग्धा वैंशपायन या मैफिलीत सहभागी होणार आहे. कार्यक्रमाचे निरूपण कुणाल रेगे आणि अपर्णा काळे करणार आहेत. वसईत प्रथमच असा कार्यक्रम होत असल्याने प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका शनिवारी, १३ जुलै रोजी सकाळी १० पासून सभागृहात उपलब्ध असणार आहेत.

विजेत्यांचा गौरव

या कार्यक्रमात वसई-विरारच्या विविध क्षेत्रांतील मान्यवर सहकुटुंब उपस्थित राहणार आहेत. त्यात प्रशानस, पोलीस, राजकारण तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. या वेळी ‘लोकसत्ता’तर्फे घेण्यात आलेल्या ‘आपली आवड’ या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविले जाणार आहे.

काय?

‘नामरंगी रंगले’

कधी?

शनिवार, १३  जुलै सायंकाळी ६.३०

कुठे?

भंडारी सभागृह, पारनाका, वसई