युवा हृदय संमेलनात तरुणांना मार्गदर्शन

कराड : पुढारी म्हणवणारे तुमच्या डोक्यात राख घालतायेत. मेंदूवर ते अतिक्रमण करतायेत आणि ते तुम्ही करू देताय हे चुकीचे आहे. तरी, पुढाऱ्यांना आजवर खांद्यावर वागवलं पण, त्यांना आता खाली उतरवले गेले पाहिजे असे प्रतिपादन नाम फाउंडेशनचे प्रमुख व प्रसिध्द सिनेअभिनेते नाना पाटेकर यांनी केले.

घारेवाडी (ता. कराड) येथील धुळोबा डोंगरावर आयोजित बलशाली युवा हृदय संमेलनात ते उपस्थित युवावर्गाला मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

पाटेकर म्हणाले, तरुणांनी जीवन का जगावं हे हेमलकसाला जाऊन आमटे कुटुंबीयांकडून शिकण्याची आज गरज आहे. माध्यमांनी खूप छान घडतंय हेही आज दाखवण्याची गरज आहे. कोणीही येतो, काहीही बोलतो, त्यातून जाळपोळ सुरू होते. हे बंद झाले पाहिजे. आपल्या गरजा किती आहेत त्या ठरवा. त्यानंतर आपले आयुष्य फार सोपं होईल.

अनासपुरे म्हणाले, सेल्फी काढणाऱ्याचे इंप्रेशन पडत नाही. आपले महत्त्व आपल्याला कळले पाहिजे आणि ते वाढलेही पाहिजे. जीवन जगताना चांगले जगा. आपण श्रीमंत होतो असा भ्रम असतो. अनेकांकडे पैसे आहे मात्र सुख-समाधान नाही. देशप्रेम, राष्ट्रप्रेम घोषणेत असणे उपयोगाचे नाही, आपल्या कृतीत ते असले पाहिजे. कुठल्याही रस्त्याला महापुरुषांची नावे देणे खूप सोपं आहे मात्र त्यांच्या रस्त्यावर आपण चालतो का? हा प्रश्न आहे. ‘व्हेलेंटाईन डे’ हा आपला नाही. आपल्या भारतीय संस्कृतीतील डे साजरे करा, महापुरुषांच्या जयंत्या स्वच्छता, वृक्षारोपणाने साजरे करा. पाण्यासाठीचा संघर्ष सुरू झाला आहे. पाऊसच न पडल्यामुळे निसर्ग बोलू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तरी आपण सावध होणार आहोत का? हा प्रश्न आहे. तरुणांची ऊर्जा सकारात्मक दिशेने वळवणे हे राष्ट्रीय काम असून, ते इंद्रजित देशमुख यांच्या माध्यमातून शिवम् प्रतिष्ठान करत आहे हे फार मोठे काम असल्याचे कौतुकोद्गार अनासपुरे यांनी काढले.

शिवम् प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक इंद्रजित देशमुख, कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, कराड र्मचट समूहाचे सत्यनारायण मिणीयार, समृध्दी जाधव यांच्यासह विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी तसेच हजारोंच्या संख्येने युवक व युवती उपस्थित होते.