News Flash

भाजप सरकारकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणार नाही

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणार नाही असे सांगून भाजप सरकारने शेतकऱ्यांचा मोठय़ा प्रमाणात विश्वासघात केला, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, असा आरोप माजी खासदार नाना पटोले यांनी येथे केला.

भाजपचा आवाज कोणी कितीही प्रयत्न केले तरी दाबू शकत नाही, या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेत माजी खासदार नाना पटोले म्हणाले, की रावणाची गोष्ट आपल्याला माहीत आहे त्यामुळे त्यांनी गर्व करू नये. ते शिर्डीजवळील निघोजमध्ये आयोजित देशव्यापी ओबीसी जनगणना परिषदेच्या कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते.

या कार्यक्रमासाठी चंद्रशेखर कुमार, हितेंद्र ठाकूर, आ. हरिसिंग राठोड, डॉ. ज्ञानेश्वर गोरे आदींसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते. माजी खासदार पटोले म्हणाले, की आपण शासनाच्या बाबतीत थोडासा अभ्यास केला असून,  हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे, त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या ४३ टक्के वाढल्या आहेत. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी भाजप सरकार लागू करणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठय़ा प्रमाणात विश्वासघात झाला, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत.

ते म्हणाले, की आम्ही जनतेचे प्रतिनिधी म्हणून लोकसभा वा विधानसभेत जातो, तेव्हा संविधानातील शपथ घेतो. त्यानंतर ज्या संविधानाची आपण शपथ घेतलेली असते त्या शपथेतील महत्त्वाच्या विचारांच्या विरोधात आपण पक्षाच्या विचारांसाठी काम करायचे हे पटत नाही. देशभरात नव्वद टक्के लोकांचा सरकारच्या धोरणांना विरोध आहे. त्याचा फायदा ओबीसींना होणार आहे.

ते म्हणाले, की छगन भुजबळ चोर आहेत म्हणून आत टाकले आहे की ते महत्त्वाचे नेते आहेत म्हणून त्यांना आत टाकले आहे, यात ज्याने त्याने अर्थ समजून घ्यावा. मग बाकी लोकांचे काय? हा प्रश्न आहे. सत्तेवर येण्यापूर्वी या सरकारने सांगितले होते, की ज्यांनी या राज्याच्या तिजोरीवर डाका टाकला आहे, त्यांना आम्ही सोडणार नाही. त्या आश्वासनाची पूर्तता सरकारकडून झालेली नाही. भुजबळ असतील, राणे असतील, त्यांच्यासह बहुजनांना संपवण्याचा घाट मात्र राज्यात आणि देशात घातला गेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2018 5:31 am

Web Title: nana patole comment on bjp
Next Stories
1 जैतापूर, रिफायनरी प्रकल्प उभारणे चुकीचे – उद्धव ठाकरे
2 कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांची भांडीकुंडी रस्त्यावर आणणाऱ्यांची नियत खोटी-पवार
3 मुंबईतील दोघांचा वाईतील धोम जलाशयात बुडून मृत्यू
Just Now!
X