News Flash

..तर पाठीत खंजीर खुपसल्यासारखं होईल, आम्ही स्वतंत्रच लढणार – नाना पटोले

राज्यात आगामी निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याचा निश्चय महाराष्ट्र काँग्रेसनं केला असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी त्यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली आहे.

नाना पटोले यांनी काँग्रेस स्वबळाविषयी स्पष्टीकरण दिलं आहे.

राज्यात सध्या सत्तेत असलेल्या महाविकासआघाडी सरकारमध्ये सारंकाही आलबेल असल्याचा दावा तिनही पक्षांकडून केला जात असला, तरी वेळोवेळे नेत्यांकडून केलेल्या विधानांमुळे त्यावर शंका उपस्थित करण्यासाठी मोठी जागा निर्माण होते. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची ठाम भूमिका मांडली आहे. त्यामुळे निवडणुकांमध्ये काँग्रेस महाविकासआघाडीसोबत दिसणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

आम्ही आधीपासूनच सांगतोय…!

शरद पवारांनी केलेल्या विधानानंतर राज्यात भविष्यात महाविकासआघाडी सरकारमध्ये तिन्ही पक्ष एकत्र दिसतील की नाही? अशी चर्चा सुरू झाली आहे. सत्तेमध्ये आणि आगामी निवडणुकांविषयीच्या विधानांमध्ये फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीच असतात, यासंदर्भात विचारणा केली असता नाना पटोले यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. “आम्ही आधीपासूनच आगामी निवडणुकांबद्दलचं आमचं धोरण जाहीर केलं आहे. समजा आम्ही सोबत आहोत असं म्हटलं आणि ऐन निवडणुकांच्या वेळी स्वतंत्र लढणार असं सांगितलं, तर ते पाठित खंजीर खुपसल्यासारखं होईल. त्यामुळे आजपासूनच आम्ही म्हणतोय, आम्ही स्वतंत्रच लढणार”, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

स्वबळावर काँग्रेस केंद्रात सत्तेवर येणार असेल, तर त्या सारखी ऐतिहासिक गोष्ट नाही – संजय राऊत

आम्ही तयारी सुरू केलीये, तुम्हीही…!

दरम्यान, यावेळी बोलताना नाना पटोले यांनी सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेना या दोघांनाही सूचक इशारा दिला आहे. “आम्ही आजपासूनच जाहीर करतोय. आम्ही स्वतंत्रच लढणार आहोत. त्यामुळे आम्ही आमची तयारी सुरू केली आहे. मित्रपक्षांना देखील आमचा संदेश आहे की तुम्हीही तयारी सुरू करा”, असं नाना पटोले म्हणाले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढण्यावर काँग्रेस ठाम असल्याचं दिसून येत आहे.

शरद पवारांच्या विधानावर राणेंचा टोमणा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी शरद पवारांनी आगामी निवडणुका एकत्रच लढणार असल्याचे संकेत दिले होते. “हे सरकार टिकेल आणि पाच वर्ष काम करेल. नुसतंच काम करणार नाही तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रित काम करुन सामान्य जनतेचं देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचं काम करेल याबाबत शंका नाही”, असं शरद पवार म्हणाले होते. शरद पवारांनी केलेल्या या विधानावर माजी काँग्रेस नेते आणि सध्या भाजपाचे खासदार असलेले नारायण राणे यांनी खोचक टोला लगावला होता. “शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात, तेव्हा त्याचा उलटअर्थी अर्थ लावायचा असतो. ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे. जरी शरद पवार तसं म्हणाले असले, तरी शरद पवार साहेब कधीही शिवसेनेसोबत निवडणूक लढवणार नाहीत”, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 5:12 pm

Web Title: nana patole says congress will fight elections independently not with mahavikas aghadi pmw 88
Next Stories
1 “ सहा महिन्यांत कोपर्डी खटल्याचा निकाल लागला पाहिजे”; संभाजीराजेंचा इशारा!
2 सातारा : नगरपालिका बांधकाम सभापतींकडून अधिकारी, ठेकेदारास शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी!
3 एकविरा देवी मंदिर आणि राजगड किल्ल्यावर ‘रोप वे’नं जाता येणार; ठाकरे सरकारनं घेतला निर्णय
Just Now!
X