News Flash

राज्य विकणाऱ्या फडणवीस सरकारला जाब विचारणार -पटोले

गेल्या पाच वर्षांत फडणवीस सरकारने पाच लाख कोटीचे कर्ज घेऊन राज्याला विकले आहे

गोंदिया : गेल्या पाच वर्षांत फडणवीस सरकारने पाच लाख कोटीचे कर्ज घेऊन राज्याला विकले आहे. राज्याचा शैक्षणिक, औद्योगिक व आरोग्यविषयक जे देशपातळीवर नाव होतं ते संपवण्याचे पाप फडणवीस सरकारने जाणीवपूर्वक केले आहे. हे सर्व प्रश्न आम्ही  विरोधी पक्ष म्हणून नव्या सरकारला विचारणार आहोत. आता जनतेची फसवणूक होणार नाही, तसेच महागाईच्या मुद्यावर सरकारला धारेवर धरू, असे मत साकोलीचे आमदार नाना पटोले यांनी दिवाळीनिमित्त त्यांच्या गृहग्राम सुकळी येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

मध्यंतरी खासदार झाल्यानंतर गोंदिया-भंडारा या दोन्ही जिल्ह्य़ाची जबाबदारी आली त्यानंतर नागपूर येथील लोकसभेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केल्याने साकोली विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष देण्यात थोडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे मतदारांशी नाळ थोडीशी तुटली असल्यामुळे माझ्या विरोधात लढणाऱ्या उमेदवाराला याचा लाभ मिळाला व ते लढतीत आले. नाही तर मी बांधणी केली असलेल्या साकोली मतदारसंघात नुसता अर्ज भरला तरी लाखांच्यावर मतांनी निवडून येण्याइतपत माझी कामगिरी होती. माझ्या सहकार्यामुळेच आमदारकी भोगत असलेल्यांनी माझ्या विरोधात लढताना पैशांचा महापूर साकोली विधानसभेत वाहिला व अखेर साम, दाम, दंड, भेद वापरून प्रयत्न केले, पण जनतेने ते सुद्धा हाणून पाडले. अशा पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकवण्याकरिता आता मी सुद्धा समाजकारणातून शुद्ध राजकारणाकडे मोर्चा वळवणार असल्याचे सूतोवाच साकोली विधानसभेचे आमदार नाना पटोले यांनी व्यक्त केले.

पक्ष सोडून गेलेल्यांना परत घेणार का? या प्रश्नावर पटोले म्हणाले की, नाही, त्यांना आता काँग्रेसची गरज नाही तसेच काँग्रेसलाही त्यांची मुळीच गरज नाही, त्यांची पोकळी मी लवकरात लवकर भरून काढणार असून लवकरच नवे नेतृत्व गोंदियात दिसणार आहे. प्रफुल्ल पटेलांनी गोंदियातील अपक्ष उमेदवाराला केलेल्या मदतीवर नाना पटोले म्हणाले की, त्यांच्या अशा पद्धतीच्या राजकारणामुळेच त्यांना दोन्ही जिल्ह्य़ात जनतेचा नेता होता आले नाही.

साकोलीत आ. फुके यांनी केलेल्या खालच्या पातळीवरच्या राजकारणावर नाना म्हणाले की, मला आजपर्यंत असे करण्याची कधीच गरज भासली नाही, पण आता मी देखील ८० टक्के समाजकारण व २० टक्केराजकारण करणार असल्याचे नाना पटोले म्हणाले. माझा ‘ईव्हीएम’वर संशय आहेच. मी तर आजही माध्यमांना सांगतो की, मतपत्रिकेवर निवडणूक घेत असणार तर मी आताच राजीनामा देऊन मतपत्रिकेवर निवडणूक लढण्यास तयार आहे आणि त्यात मी दाखवून देणार की मी कसा एक लाखांच्यावर मतांनी निवडून येतो ते. कुठलीही निवडणूक ही मतपत्रिकेवर घेण्याच्या मागणीवर ठाम असल्याचे सूतोवाच नाना यांनी यावेळी केले.

गोंदिया- भंडारा जिल्ह्य़ात सिंचनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यावर भर राहणार असून पुढील काळात आपण यावर अधिक जोर देणार असल्याचे धोरण आखले असल्याचेही यावेळी नाना पटोले म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 4:46 am

Web Title: nana patole slams devendra fadnavis government zws 70
Next Stories
1 दिवाळीच्या दिवशी दोन महिलांची हत्या
2 मेघेंच्या दोन्ही हातात लाडू
3 आर्णीत काँग्रेसचा पराभव, मात्र भाजपचाही मतांचा टक्का घसरला
Just Now!
X