अनंत चतुर्दशीला मुरुड तालुक्यात मोठय़ा उत्साहात श्रीच्या मूर्तीचे विसर्जन झाले. परंतु दुसऱ्या दिवशी पहाटे समुद्रकिनाऱ्यावर शेकडय़ाने मूर्ती वाहून आल्या होत्या. ते विद्रूप दृश्य पर्यटकांना दिसू नये म्हणून प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांनी सकाळी ५ वाजल्यापासून श्रीच्या मूर्त्यां शोधून स्वच्छ धुऊन मूर्तीचे खोल समुद्रात पुन्हा विसर्जन केले. परंतु असे सातत्याने होत असल्याने गणेश भक्तांनी कृत्रिम तलावात श्रीचे विसर्जन करणे हा पर्याय स्वीकारण्याची गरज निसर्ग मित्रांकडून बोलली जाते.

वाहून आलेल्या मूर्ती वाळूत अडकून बसतात व पर्यटकांच्या पायाखाली येतेय हे अत्यंत वाईट दृश्य आहे. जर आपण या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित केल्या तर ३ दिवसांत पूर्णपणे विरघळतात व त्याचा मातीवर प्रक्रिया करून शेतीसाठी खत बनवता येते याकडे गणेशभक्तांनी सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात हजारो श्रीसदस्य स्वच्छतेचे काम करत आहेत. मुरुड तालुक्यात १०० श्रीसदस्यांनी श्रीगणेश मूर्तीचे पुन्हा विसर्जनाचे काम केले.