25 September 2020

News Flash

कृषी संजीवनी  प्रकल्पाच्या व्याप्तीत वाढ

आता पाच हेक्टपर्यंतच्या शेतकऱ्यांना लाभ

आता पाच हेक्टपर्यंतच्या शेतकऱ्यांना लाभ

मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या व्याप्तीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार आजवर केवळ अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांनाच मिळणारा प्रकल्पाचा लाभ आता पाच हेक्टपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार आहे. या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मंजुरी दिली.

विदर्भ व मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त आणि हवामान बदलास अतिसंवेदनशील असणारी ४ हजार २१० गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदी खोऱ्यातील खारपाण पट्टय़ातील ९३२ गावे अशा एकूण ५ हजार १४२ गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (हवामान अनुकूल कृषी प्रकल्प) राबविण्यात येत आहे. हवामान बदलांना अनुकूल असा कृषी विकास करून शेतकरी व एकंदर कृषी क्षेत्रास सक्षम करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना यामध्ये करण्यात येत आहेत. जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने सुमारे ४ हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प राज्यातील १५ जिल्ह्य़ांमध्ये राबविला जात आहे. ही अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी प्रकल्प सुकाणू समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे.

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याविषयीच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. या सुधारणांनुसार, प्रकल्प गावातील अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांबरोबरच आता २ ते ५ हेक्टपर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांनादेखील प्रकल्पांतर्गत विविध बाबींसाठी लाभ दिला जाणार आहे. प्रकल्प गावातील अत्यल्प व अल्प भूधारक शेतकरी आणि भूमिहीन कुटुंबे यांना वैयक्तिक लाभाच्या बाबींसाठी अर्थसाहाय्याचे प्रमाण ५० टक्क्यांवरून आता ७५ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. तसेच २ ते ५ हेक्टरपर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना ६५ टक्के अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. कृषी यांत्रिकीकरणासाठी शेतकरी गटांना ६० टक्क्यांच्या मर्यादेत अनुदान दिले जाईल. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याची माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्याने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 3:42 am

Web Title: nanaji deshmukh krishi sanjivani project for benefit to farmers of 5 hectares land zws 70
Next Stories
1 सात वर्षे बेपत्ता पतीपासून घटस्फोटाचा अर्ज मंजूर
2 राजकारण अस्पृश्य मानणाऱ्या वैद्यकीय जागृती मंचचे अध्यक्ष भाजपच्या मांडवात
3 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची किरकोळ कारणावरूनआत्महत्या
Just Now!
X