मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती

सावंतवाडी : नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा विषय आमच्या दृष्टीने केव्हाच संपला आहे, असे नि:संदिग्ध शब्दांत जाहीर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबतच्या गेल्या काही दिवसांच्या चच्रेला मंगळवारी पूर्णविराम दिला.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील विकास योजनांचा आढावा घेऊन पुढील नियोजनासाठी मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत गेले दोन दिवस येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात बठका पार पडल्या. त्यानंतर मंगळवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत नाणारसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी त्याच्या पुनरूज्जीवनाची शक्यता फेटाळून लावली. या संदर्भात शिवसेनेच्या मुखपत्रात प्रवर्तक कंपनीने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीचा या निर्णयाशी काहीही संबंध नाही, असे उद्धव यांनी स्पष्ट केले. अशा कोणत्याही विषयावरील धोरण मी ठरवतो, जाहिरातदार नव्हे. जाहिरात छापून आली म्हणजे आमची भूमिका बदलली, असे नाही. या प्रकल्पाच्या समर्थनासाठी माझ्याकडे कोणीही आलेले नाही, असे ठाकरे म्हणाले.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यंतील अनेक रेंगाळलेल्या योजना मार्गी लावण्यासाठी तसेच पर्यटन, मासेमारी, फलोत्पादन, पर्यावरणपूरक उद्योग आदींना गती देऊन या दोन जिल्ह्यांमध्ये सर्वागीण विकासासाठी ‘सिंधुरत्न समृद्ध विकास योजने’ची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र, त्याबाबतचा तपशील स्पष्ट केला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय, विमानतळ, ट्रॉमा केअर सेंटर इत्यादी योजनांच्या पूर्ततेसाठी वेगाने पावले उचलण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असल्याचेही ठाकरे यांनी नमूद केले.

मंत्रिमंडळात ठराव करा -राणे

नाणार प्रकल्पाच्या विरोधात मंत्रिमंडळात आणि विधिमंडळात ठराव करावा, असे आव्हान खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.आपण मुख्यमंत्री असताना पर्यटन विकास महामंडळ स्थापन केले होते, पुढे मंत्री छगन भुजबळ यांनी ते रद्द केले. आता कसा निधी पर्यटनाला देणार ते सांगा, असा सवाल करून राणे म्हणाले की, सिंधुदुर्गच्या मच्छीमार बांधवांची उपासमार सुरू आहे. त्यांना काय देणार? मत्स्य दुष्काळ दूर करण्यासाठी काय निर्णय घेतला याबाबत काहीच झालेले नाही असा आरोप  त्यांनी केला.