नाणारमध्ये जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवसेना आमदार राजन साळवींना गुरुवारी अटक करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी ही कारवाई झाल्याने नाणारमधील राजकीय वातावरण तापले आहे.

नाणारमधील प्रकल्पाला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सध्या जमावबंदीचे आदेश लागू आहेत. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेने केंद्र सरकारविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनात जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवसेना आमदार राजन साळवी यांना गुरुवारी पोलिसांनी अटक केली. त्यांची आजच जामिनावर सुटका होण्याची शक्यता आहे.

शिवसेना नाणार विरोधात आक्रमक असून मनसे आणि नारायण राणे यांनी देखील प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. मात्र, हा विरोध झुगारुन लावत केंद्रातील भाजपा सरकारने नाणार प्रकल्पासाठी सौदी अरेबियाच्या अराम्को कंपनीशी करार केला. सौदी अराम्को ही जगातील सर्वात मोठी तेल कंपनी असून एक्झॉन मोबील या खासगी क्षेत्रातील जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या (पहिली अर्थातच अ‍ॅपल) बलाढ्य कंपनीपेक्षा सौदी अराम्को १६ पट मोठी आहे. जगाच्या दैनंदिन तेल बाजारात साधारण ३० टक्के वाटा सौदी अरेबियाचा म्हणजेच सौदी अराम्कोचा असतो. रत्नागिरी जिल्ह्य़ातील नाणार येथील संभाव्य तेल शुद्धीकरण प्रकल्पात ४,४०० कोटी डॉलरची गुंतवणूक असून यातील निम्मा वाटा सौदी अराम्कोचा आहे.

नाणारमध्ये नेत्यांचे दौरे
१९-२० एप्रिल रोजी काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळही या परिसराला भेट देऊन प्रकल्पग्रस्तांची भूमिका समजावून घेणार आहे. त्यापाठोपाठ २३ एप्रिल रोजी उद्धव ठाकरे, तर १० मे रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार येथे येणार आहेत.