कोकणातील नाणार येथील प्रकल्प विदर्भात आणावा, अशी मागणी भाजपाचे आमदार आशीष देशमुख यांनी केली आहे. विदर्भात हा प्रकल्प सुरू करावा, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय मंत्री धर्मेश प्रधान यांची लवकरच भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राजापूर तालुक्यातील बहुचर्चित नाणार रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स प्रकल्पामध्ये सौदी अरेबियाच्या ‘सौदी अराम्को’ कंपनीचा ५० टक्के हिस्सा राहणार असून त्याबाबतच्या सामंजस्य करारावर दिल्लीत नुकत्याच सह्या करण्यात आल्या. यानंतर नाणार प्रकल्पाविरोधात शिवसेना, मनसे आणि अन्य राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. सोमवारी नाणारमधील सभेत उद्धव ठाकरे यांनी हा प्रकल्प विदर्भात न्यावा, असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार आशीष देशमुख यांनी नाणार प्रकल्प विदर्भात आणावा, अशी मागणी केली आहे.
कोकणात हा प्रकल्प झाला नाही तर तो गुजरातमध्ये जाण्याची शक्यता असल्याने विदर्भात हा प्रकल्प सुरू करावा, अशी मागणी देशमुख यांनी केली. या संदर्भात दीड महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते, असे देशमुख म्हणाले.

औद्योगिक विकासासाठी काटोल तालुक्यातील १५ हजार एकर जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने प्रस्तावित केली आहे. राज्य शासनातर्फे नागपूर मुंबई समृद्धी मार्गाची निर्मिती केली जात आहे. याच मार्गावर पेट्रोलसाठी नागपूर ते मुंबई वाहिनी टाकल्यास सरकारचे कोट्यवधी रुपये वाचतील, असेही देशमुख म्हणालेत.