16 February 2019

News Flash

नाणार प्रकल्पबाधितांचा सेना मंत्री, आमदारांवर संताप

नाणार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी या प्रकल्पबाधित नागपूरला आले होते.

(संग्रहित छायाचित्र)

मोर्चाला परवानगी नाकारली तेव्हा तुम्ही कोठे होता

नागपूर : कोकणातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात तेथील नागरिकांना मोर्चासाठी परवानगी नाकारल्याने ते संतापले. त्यांच्या भेटीला गेलेले सेनेचे मंत्री व आमदारांवरही त्यांनी रोष व्यक्त केला. त्यामुळे त्यांना काढता पाय घ्यावा लागला.

नाणार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी या प्रकल्पबाधित नागपूरला आले होते. त्यांना विधानभवनावर मोर्चा काढण्याची परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी यशवंत स्टेडियममध्ये धरणे आंदोलन सुरू केले. आंदोलकांची भेट घेण्यासाठी रत्नागिरीचे पालकमंत्री व सेनेचे नेते रवींद्र वायकर यांच्यासह आमदार नीलम गोऱ्हे, राजन साळवी, सुनील प्रभू, प्रताप सरनाईक, सुनील शिंदे, विलास पोतनीस तेथे पोहोचले. यावेळी आंदोलकांनी आमदार व मंत्र्यांवरच संताप व्यक्त केला. मोर्चाला परवानगी नाकारली तेव्हा तुम्ही कोठे होता, असा थेट सवाल त्यांना केला. आमदारही संतप्त झाले. त्यांनी ‘हीच का तुमची  संस्कृती’ म्हणून प्रति सवाल केला. त्यामुळे आंदोलक संतापले. नागपुरात आल्यावर कुठल्याच सेना आमदारांनी आमच्या व्यवस्थेविषयी साधी चौकशी केली नाही आणि आता निवडणुकीच्या तोंडावर समर्थनासाठी येथे आले का? असा सवाल केला. यावेळी आंदोलकांपैकी अशोक बालम यांनी सहकाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक आक्रमक झाल्याचे लक्षात येताच सेना आमदार, मंत्र्यांनी तेथून काढता पाय घेतला. दरम्यान, आंदोलकांनी त्यांना मोर्चाची परवानगी न दिल्याने सरकारचा निषेध केला.  दरम्यान, आंदोलनाला भेट देण्यासाठी काँग्रेसचे आमदार नितेश राणे पोहोचले. राणे यांनी कुठल्याही परिस्थितीत नाणार रिफायनरी होऊ देणार नाही, असे आंदोलकांना सांगितले.

First Published on July 12, 2018 4:39 am

Web Title: nanar project victim express anger on shiv sena ministers and mlas