|| संजय बापट

मुख्यमंत्र्याचा चर्चेचा प्रस्ताव फेटाळत शिवसेनेने कामकाज रोखले

कोकणातील प्रस्तावित नाणार प्रकल्पाच्या विरोधावरून बुधवारी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये स्पर्धा रंगली. मंगळवारी विधान परिषदेत बघ्याची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने बुधवारी विधानसभेत मात्र अचानक आक्रमक भूमिका घेत हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी करीत सभागृहाचे कामकाज रोखले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पग्रस्तांशी चर्चेचा दिलेला प्रस्तावही शिवसेनेने फेटाळला असून प्रकल्प रद्द झाल्याशिवाय माघार नाही असा गर्भीत इशारा सरकारला दिला आहे. मात्र विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करण्यावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये स्पर्धा लागली होती. अखेर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दोघांनाही बोलण्याची संधी न दिल्याने राजदंड पळविण्यावरूनही या दोन्ही पक्षांमध्ये खडाजंगी झाली.

नाणार प्रकल्पावरून विरोधकांनी मंगळवारी विधान परिषदेत मांडलेल्या लक्षेवधीवरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाचे जोरदार समर्थन केले होते. तसेच प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करून हा प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली होती. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह नीलम गोऱ्हे यांचा अपवाद वगळता सेनेचा एकही सदस्य बोलला नव्हता. बुधवारी मात्र नाणार प्रकल्पग्रस्ताचा मोर्चा आल्याने शिवसेना खडबडून जागी झाल्याचे चित्र दिसत होते. सभागृहाचे कामकाज सुरळीत सुरू असतानाच शिवसेना प्रतोद सुनिल प्रभू यांनी मंत्र्यांचे भाषण थांबवत नाणारवर बोलण्याची संधी द्या, अशी मागणी केली. त्याला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि नितेश राणे यांनी जोरदार आक्षेप घेतला. आम्ही या प्रकरणी स्थगन प्रस्ताव दाखल केला असून  प्रथम आम्हाला बोलू द्या, शिवसेनेने कोणतीही नोटीस दिलेली नाही.त्यामुळे प्रथम आमचे ऐकून घ्या अशी भूमिका काँग्रेसने घेतली. त्यामुळे  संतप्त झालेल्या सेना आमदारांनी थेट अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत(वेल) धाव घेत घोषणाबाजी सुरू केली. विनाशकारी रिफायनरी प्रकल्प शिवसेना कदापि होऊ  देणार नाही. हा प्रकल्प रद्द झालाच पाहिजे अशा घोषणा देत शिवसेनेने गोंधळ सुरू केला. त्यामुळे विधानसभेचे कामकाज तब्बल तीन वेळा तहकूब झाले.  मात्र त्यानंतरही विरोधक आणि सेना आपापल्या भूमिकेवर अडून राहिल्याने अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कोणालाही बोलण्याची संधी न देता विनियोजन विधेयक मंजुरीची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे आक्रमक झालेल्या सेना आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करीत राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीही राजन साळवी ,प्रताप सरनाईक आणि नितेश राणे यांच्याच राजदंड पळविण्यावरून जोरदार झटापट झाली. यावेळी झालेल्या प्रचंड गोंधळातच अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

नाणारवासीयांचा मोर्चा

नाणार  प्रकल्पाला विरोध करण्यासाठी तेथील स्थानिक नागरिकांनी नागपूर विधानभवनावर मोर्चा काढला. हा मोर्चा यशवंत स्टेडियम येथेच अडविण्यात आल्याने नागरिकांनी तिथेच धरणे सुरू केले. मोर्चेकऱ्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन स्थानिक आमदार राजन साळवी यांनी हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला मात्र अध्यक्षांनी परवानगगी नाकारल्याने सेना आमदारांनी राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. या प्रकल्पास आमचा विरोध असून आता चर्चा नाही तर प्रकल्प रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी असे सुनिल प्रभू यांनी सांगितले.  त्यानंतर शिवसेना आमदारांनी मोर्चाला मार्गदर्शन करतांना कोणत्याही परिस्थितीत विनाशकारी नाणार प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जो शब्द नाणारवासीयांना दिला आहे. त्या शब्दाबाहेर कुणी जाणार नाही. आम्ही  शिवसेनेचे सर्व आमदार तुमच्या पाठीशी उभे राहून विनाशकारी प्रकल्पाला तीव्र विरोध करू, असे आश्वासन सेनेच्या शिष्टमंडळाने मोर्चेकऱ्यांना दिले.