प्रकल्प पुन्हा आणण्याचा समर्थकांचा निर्धार

रत्नागिरी जिल्ह्य़ातील नाणार येथील प्रस्तावित बहुचर्चित तेलशुद्धीकरण प्रकल्प स्थानिकांच्या विरोधामुळे रायगड जिल्ह्य़ात हलवण्याचा निर्णय शासनाने घेतला असताना जिल्ह्य़ातील विविध संस्था, सामाजिक संघटना प्रकल्पाच्या समर्थनासाठी एकवटल्या आहेत. या प्रकल्पाच्या समर्थनासाठी शनिवारी, २० जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

शहरातील केड्राई, अखिल चित्पावन विद्यार्थी साहाय्यक मंडळ, राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था, हॉटेल असोसिएशन, लायन्स क्लब, रोटरी क्लब, क्षत्रिय मराठा मंडळ, जाणीव फाऊंडेशन, जनजागृती संघ, आधार फाऊंडेशन, व्यापारी संघटना आदींनी एकत्र येत या मोहिमेसाठी कोकण विकास समितीची स्थापना केली आहे. या समितीचे समन्वयक टी. जी. ऊर्फ बाळासाहेब शेटय़े, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे निवृत्त ज्येष्ठ अधिकारी केशव भट, राजापूर तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या समितीचे प्रवक्ता अविनाश महाजन आदींनी या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत, हा प्रकल्प पुन्हा नाणारमध्ये आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. अशी मोहीम सुरू करण्यास थोडा उशीर झाला आहे, हे खरे असले तरी अजूनही वेळ निघून गेलेली नाही. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी किमान दहा हजार एकर जमिनीची गरज आहे. त्यापैकी राजापूर तालुक्यातील सुमारे साडेसात हजार एकर जमिनींच्या मालकांनी लेखी संमतिपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केली असून, उरलेली जमीन मिळण्यातही फार अडचण येणार नाही, असा दावा त्यांनी केला.

मूठभर प्रकल्प विरोधक आणि राजकारण्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे; पण त्यांच्या दबावामुळे प्रकल्पाला पाठिंबा असलेले बहुसंख्य गप्प राहिले; पण आता वातावरण बदलले आहे, असा दावा करून महाजन म्हणाले की, ‘‘प्रकल्पविरोधी समितीच्या पदाधिकाऱ्यांची या प्रकल्पात जमीन जाणार नाही, हे उघड गुपित आहे. वेगळ्याच हितसंबंधांमुळे ते या प्रकल्पाला विरोध करीत आहेत. या संदर्भात पाहणी करण्यासाठी नेमलेल्या सुकथनकर समितीची रत्नागिरीमध्ये बैठक झाली तेव्हा पाठिंबादर्शक संख्येने जास्त असल्याचे सिद्ध झाले. प्रकल्पामुळे निर्माण होऊ  शकणारा रोजगार आणि विकासाची जाणीव तालुक्यातील विविध घटकांना होऊ लागली असून, ते सर्व या मोहिमेत सहभागी झाले आहेत.’’

समितीचे कार्यकर्ते शहरातील व्यापारी, बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, डॉक्टर, इंजिनीयर, चार्टर्ड अकाऊंटंट्स, विविध सामाजिक संस्था, विविध ज्ञातिसंस्था यांच्या भेटी घेत असून त्यांना प्रकल्पाबद्दल पुरविण्यात आलेले गैरसमज आणि वस्तुस्थिती याबाबत माहिती देत आहेत. कारखान्याच्या परिसराभोवतालच्या हवामानाच्या दर्जाची सतत तपासणी करण्याची व्यवस्था सर्वत्र उभारली जाणार आहे. कारखान्याकडून प्रदूषण झालेच तर या जिल्ह्य़ाचे रहिवासी म्हणून व्यवस्थापनाला जाब विचारण्याची मोकळीक भूमिपुत्र म्हणून आपल्याला असणारच आहे, असेही या सदस्यांनी स्पष्ट केले.

प्रतिमोर्चाची तयारी

नाणार प्रकल्पाच्या समर्थनार्थ काढण्यात येणाऱ्या मोर्चाविरोधात मोर्चा काढण्याची तयारी प्रकल्प विरोधकांनी केली आहे. ‘नाणार’ला प्रकल्पग्रस्तांचा विरोध आहे, हे ठासून सांगण्यासाठी २० जुलैला प्रतिमोर्चा काढण्यात येणार आाहे. कोकण भूमिकन्या महामंडळाच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार असून त्यात कोकण शक्ति महासंघाचे कार्यकर्ते सहभागी होतील, असे महासंघाचे पदाधिकारी सत्यजित चव्हाण यांनी सांगितले.