नाणार ग्रामस्थ आणि शिवसेनेच्या विरोधामुळे मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरीतून रायगड जिल्ह्य़ात नेण्याची घोषणा केलेला प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्प नाणारमध्येच उभारावा या मागणीसाठी शनिवारी रत्नागिरीत मोर्चा काढण्यात आला.

तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या या मोर्चाला स्थानिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मोर्चात विविध व्यावसायिक संघटनांबरोबरच राजापूर तालुक्यातील ग्रामस्थांचा लक्षणीय सहभाग होता. सुमारे दीड ते दोन हजार नागरिक मोर्चात सहभागी झाले होते.

कोकण विकास समिती आणि जनकल्याण प्रतिष्ठान यांनी काढलेल्या या मोर्चाला शहरातील मारुती मंदिरापासून दुपारी १२ वाजता सुरुवात झाली.  अराजकीय संघटनांच्या कार्यकर्त्यांबरोबरच रत्नागिरी, लांजा, राजापूर, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील अनेकजण मोर्चात सहभागी झाले होते. व्यापारी, बांधकाम व्यावसायिक, औषध विक्रेते, कर सल्लागार, मच्छीमार, लघु उद्योजक, सुवर्णकार, गॅरेज व्यावसायिक, प्लम्बर इत्यादींच्या संघटना, तसेच काही ज्ञातिसंघटना, सेवाभावी संस्था आणि नागरिकही सहभागी झाले होते.

तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या समर्थनाचे फलक घेऊन मोर्चेकऱ्यांच्या हाती होते. तेलशुद्धीकरण प्रकल्प नाणारमध्येच उभारण्यात यावा, अशी मागणी मोर्चेकरी करीत होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी भडकमवार यांना निवेदन दिल्यानंतर मोर्चाची सांगता झाली.

विरोधक विरुद्ध समर्थक

रत्नागिरी जिल्ह्य़ातील प्रस्तावित नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला होता. प्रकल्पाविरोधात रत्नागिरी आणि मुंबईतही मोर्चे काढण्यात आले होते. तेलशुद्धीकरण प्रकल्प झाल्यास निसर्ग आणि पर्यावरणावर दुष्परिणाम होईल, मासेमारीसह सागरी संपत्तीला धोका निर्माण होईल इत्यादी आक्षेप घेण्यात आले होते. तेथील ग्रामस्थांनी या प्रश्नावर शिवसेनेलाही साकडे घातले होते. शिवसेनेनेही ग्रामस्थांची बाजू घेत प्रकल्पास विरोध केला होता. तो लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच हा प्रकल्प रायगड जिल्ह्य़ात हलवण्याची घोषणा केली होती. आता या प्रश्नावर विरोधक विरुद्ध समर्थक असे रत्नागिरी जिल्ह्य़ात दोन गट पडले आहेत.