28 February 2020

News Flash

नांदेडात ट्रकने दुचाकीला चिरडले; दोघांचा मृत्यू

भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला.

(सांकेतिक छायाचित्र)

भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार (दि.२) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अर्धापूर शहर पूर्व वळण रस्त्यावर लहानमार्गे तामसा टी पॉइंटच्या शिवाजी चौकात घडली.  अर्धापूरकडून तिरकसवाडी (ता.मुदखेड) येथील बालाजी गुणाजी कोकाटे (वय ४०) व पुंडलिक दामाजी शिंदे (वय ५२) हे दोघेजण दुचाकी क्र.एम.एच.२६.यू.५४४० वरून लहानमार्गे तामसा रोडने आपल्या गावाकडे जात असताना अर्धापूर पूर्व वळण रस्त्यावरील तामसा टी पॉइंटच्या शिवाजी चौकात हिंगोलीकडून नांदेडकडे भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रक क्रं.एम.एच. ३५.के.३६९० ने जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील बालाजी गुणाजी कोकाटे यांचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा पुंडलिक दामाजी शिंदे यांना उपचारासाठी नेत असताना रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला.

अपघाताचे वृत्त कळताच निवडणूक प्रचारासाठी जात असलेले काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी भाऊराव कारखान्याचे संचालक प्रवीण देशमुख, बाजार समितीचे संचालक तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख दत्ता पाटील पांगरीकर, सुभाष देशमुख, सोनाजी सरोदे, राजेश लोणे, गोविंद महाराज गोदरे यांनी अपघातातील मयत व जखमींना बाहेर काढून सामाजिक बांधिलकी जोपासत मदत केली. अपघातस्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती तर काही जण जखमींचे छायाचित्र आणि व्हीडीओ काढण्यासाठी गर्दी करित होते; परंतु राजकीय प्रचारकांनी मात्र जखमींना मदत केली.

दरम्यान अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे व महामार्ग सुरक्षा पथकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक शेख रहेमान व कर्मचारी त्वरीत घटनास्थळी धावून आले आणि येथील वाहतूक सुरळीत केली.

First Published on October 3, 2019 11:46 am

Web Title: nanded accident two dead nck 90
Next Stories
1 “मोदी नाही तर महात्मा गांधीच राष्ट्रपिता, तुम्ही ‘शाह’ असाल पण संविधानच बादशाह”
2 ‘मरेपर्यंत काँग्रेस सोडणार नाही’; महाराष्ट्रातील काँग्रेसच्या मोठ्या नेत्याला फोडण्यात भाजपा अपयशी
3 हृदयद्रावक! भावाला वाचवायला गेला अन् खड्ड्यातील पाण्यात बुडून दोघांचाही मृत्यू
Just Now!
X