शासकीय कंत्राटदार सुमोहन राममोहन कनगला यांच्या आत्‍महत्‍येप्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी शहरातील मोठे उद्योजक आणि नांदेड चेंबर्स ऑफ कॉमर्सचे सचिव चंद्रकात गव्हाणे यांना अटक केली. आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

नांदेडच्या विद्यानगर परिसरात वास्‍तव्यास असलेले कंत्राटदार सुमोहन राममोहन कनगला यांनी बुधवारी संध्याकाळी निवासस्‍थानी स्‍वतःच्या पिस्‍तूलमधून गोळी झाडून आत्‍महत्‍या केली होती. आत्‍महत्‍येपूर्वी त्‍यांनी इंग्रजीतून तीन पानी सुसाईड नोट लिहिली होती. यात शहरासह परराज्‍यातील व्‍यक्तींकडून त्रास दिला जात असल्याने आत्महत्या करत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

भाग्यनगर पोलिसांनी कनगला यांचे बंधू मुरलीमोहन राममोहन कनगला यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. यात शहरातील मोठे उद्योजक आणि नांदेड चेंबर्स ऑफ कॉमर्सचे सचिव चंद्रकांत गव्‍हाणे, हैदराबाद येथील बाला रेड्डी, विनोद रेड्डी व ओडिशातील जितेंद्र गुप्‍ता यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. यातील चंद्रकांत गव्‍हाणे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपींनी कनगला यांना कंपनीत गुंतवणूक करायला लावून ३ कोटी ७५ लाख रूपयांची फसवणूक केली. कराराप्रमाणे उद्योजक चंद्रकांत गव्‍हाणे याने ५० टक्के गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले होते. परंतू ते पूर्ण केले नाही. तसेच बाला रेड्डी, विनोद रेड्डी या आरोपींनी आयसीएसए या कंपनीतून कनगला यांचे ८० लाख रूपये परत केले नव्हते. तसेच जितेंद्र गुप्‍ता यांच्याकडून १ कोटी १६ लाख रूपये येणे बाकी होते. जालना व नांदेड येथे आयपीडीएस प्रकल्पामधून हे पैसे येणे बाकी होते. या प्रकरणाचा अधिक तपास भाग्यनगर पोलिस स्‍थानकाचे पो.नि.अनिरूद्ध काकडे हे करीत आहेत.