नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील मानूर येथील शिवारात गुरांना पाणी पिण्यासाठी केलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार (दि.2) रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. निलेश माधवराव पांढरे (वय 9) व नितीन माधवराव पांढरे (वय 6) अशी मयत भावंडांची नावे आहेत.

जिल्ह्यातील मानूर येथील रहिवासी शिरूनाबाई पांढरे ह्या बुधवारी सकाळी दोन मुलांना घेऊन शेतात कामासाठी गेल्या होत्या. शेतात काम करीत असताना त्यांची दोन्ही मुले शेतात खेळत होती. दरम्यान शेजारी असलेल्या एका शेतकर्‍याने शिवारात गुरांना पाणी पिण्यासाठी शेतात एक 10 ते 12 फूटाचा एक खड्डा तयार केला होता. दोन्ही भावंडे खेळत-खेळत खड्ड्याजवळ गेले असताना नितीन पांढरे याचा अचानक तोल गेल्याने तो खडड्यात पडला.

आपला भाऊ पाण्यात पडलेला पाहून निलेशने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचाही तोल गेल्याने दोघेही पाण्यात पडले. ही घटना शिरूनाबाई यांच्या लक्षात येताच त्यांनी मुलांना वाचविण्यासाठी आरडाओरड केली. पण मदत मिळेपर्यंत दोन्ही भावंडाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मनाला चटका लावणार्‍या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्‍त केली जात आहे.