काँग्रेस, भाजप, शिवसेनेने इच्छुकांकडून अर्ज मागविले

नांदेड-वाघाळा महानगरपालिका आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजप व शिवसेनेत गोंधळात गोंधळ’ हा प्रयोग रंगला असताना दुसऱ्या बाजूला सत्ताधारी काँग्रेस पक्षामध्ये उमेदवारीसाठी गर्दी झाली आहे.

येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यादरम्यान महानगरपालिकेची पाचवी निवडणूक होत असून या स्थानिक संस्थेतील काँग्रेसची सत्ता कायम राखण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यूहरचना केली आहे. काँग्रेस पक्षाने २० नव्या प्रभागातल्या ८१ जागांसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सर्वप्रथम सुरू केल्यानंतर मागील दोन आठवडय़ात सुमारे ८०० पेक्षा जास्त अर्जाची विक्री झाली. त्यानंतर इच्छुकांचे अर्ज पक्षाच्या कचेरीत शुल्क आकारून दाखल करून घेतले जात आहेत. आतापर्यंत पाचशेहून अधिक इच्छुकांचे अर्ज पक्षाकडे आले असून ही प्रक्रिया ३० तारखेपर्यंत चालणार आहे.

महापौर शैलजा स्वामी यांचे वास्तव्य प्रभाग क्र.४ मध्ये असून तेथील एक जागा ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित असली तरी त्या आगामी निवडणूक लढविणार नसल्याचे समोर आले आहे. याच प्रभागात एक जागा सर्वसाधारण असून ही जागा लढविण्यास महापौरांचे पती व मनपा स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी इच्छुक आहेत. पक्षाने उमेदवारी दिली तर आपण ही जागा लढवू अन्यथा पक्षाचा प्रचार करू असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे काही विद्यमान नगरसेवक मनाने आधीच भाजपमध्ये गेलेले आहेत. त्यांच्यासह अन्य काही नगरसेवकांनी काँग्रेसऐवजी भाजपची उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न चालवला आहे, असे सांगण्यात आले. काँग्रेस नेत्यांना अशा सात ते आठ नगरसेवकांबद्दल संशय आहे.

काँग्रेसपाठोपाठ भाजपच्या शहर जिल्हा शाखेने इच्छुकांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू केली. आतापर्यंत दोनशेहून अधिक इच्छुकांनी पक्षाचे अर्ज नेले आहेत. त्यानंतर शिवसेनेने दोन दिवसांपूर्वी दोन वेगवेगळ्या जाहिराती प्रसिद्ध करून इच्छुकांकडून अर्ज मागविले. राज्यात सत्तेवर असलेल्या या दोन्ही पक्षांमध्ये गोंधळाची स्थिती समोर येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे येत्या रविवारी नांदेडमध्ये येत असल्याच्या पाश्र्वभूमीवरच या पक्षातील बेबनाव ठळकपणे समोर आला आहे. खासदार अशोक चव्हाण यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे सेनेचे लोहा-कंधार मतदारसंघाचे आमदार असले तरी नांदेडमधील प्रदीर्घ वास्तव्यामुळे स्थानिक राजकारणावर त्यांचा प्रभाव आहे. मात्र शिवसेनेच्या निवडणूक तयारीपासून त्यांनी स्वतला दूर ठेवले आहे. त्यांचा एक पुतण्या सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक आहे. आगामी निवडणुकीत तो भाजपतर्फे निवडणूक लढविणार असल्याचे सांगण्यात येते.

मनपा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात येणाऱ्यांचे प्रवेश सोहळे करण्यावरून पक्षाच्या दोन स्थानिक नेत्यांमध्ये चढाओढ लागली आहे. तरोडा भागातील गजानन देशमुख व त्यांच्या समर्थकांचा भाजप प्रवेश पक्षाच्या शहर कार्यालयात निश्चित झाला होता. परंतु हा प्रवेश सोहळा पक्षाचे राज्य उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांनी आपल्या निवासस्थानी घेण्यास भाग पाडले. त्यातून पक्षातील बेबनाव समोर आल्यानंतर जुन्या कार्यकर्त्यांनी या प्रकारावर नाराजी व्यकत केली. अन्य पक्षातील कार्यकर्त्यांना भाजपात प्रवेश देण्याची प्रक्रिया पक्ष कार्यालयातच झाली पाहिजे असा पक्षाचा दंडक असतानाही खतगावकरांनी घरेलु प्रवेश सोहळ्याचा परिपाठ सुरूच ठेवला आहे.