22 January 2020

News Flash

नांदेडचा पहिला ‘जायंट किलर’!

२०१४ सालच्या मोदी लाटेत अशोक चव्हाण यांनी नांदेडची जागा काँग्रेस पक्षाकडे कायम राखताना तब्बल ८० हजारांचे मताधिक्य घेतले होते

प्रताप पाटील चिखलीकर

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील काही मतदारसंघात नवा, तर काही ठिकाणी धाडसी प्रयोग करताना मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या विरोधात भाजपतील सर्व इच्छुकांना डावलून त्या वेळी शिवसेनेचे आमदार असलेल्या प्रताप पाटील चिखलीकर यांना उभे करण्याचा निर्णय घेतला. तेच चिखलीकर आता नांदेडच्या राजकारणात ‘जायंट किलर’ ठरले आहेत.

२०१४ सालच्या मोदी लाटेत अशोक चव्हाण यांनी नांदेडची जागा काँग्रेस पक्षाकडे कायम राखताना तब्बल ८० हजारांचे मताधिक्य घेतले होते. त्यांचा दबदबा, त्यांचे राजकीय कर्तृत्व आणि निवडणुकांतील एकंदर क्षमता लक्षात घेता, यंदा काँग्रेस ही जागा कायम राखील, असे सर्वसाधारणपणे मानले जात असताना, नांदेड लोकसभा क्षेत्राशी थेट संबंधित नसलेल्या चिखलीकरांनी आपला प्रभाव अन् ‘प्रताप’ दाखवत आपल्या ‘गुरू घराला’ जबर हादरा दिला.

ठीक ३० वर्षांपूर्वी १९८९ च्या ऐतिहासिक लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. ते तेव्हा जेमतेम तिशीमध्ये होते. तीन दशकांनंतर आता वयाच्या एकसष्टीत दाखल झालेल्या चव्हाण यांना २०१९ मध्ये पराभवाचे तोंड दाखवत चिखलीकरांनी संपूर्ण महाराष्ट्राचे अन् भाजपतील दिग्गज नेत्यांचेही लक्ष वेधून घेतले.

प्रताप पाटील यांचे मूळ गाव म्हणजे कंधार तालुक्यातील चिखली, म्हणून ते चिखलीकर. त्यांचे वडील गोिवदराव पाटील हे जिल्ह्यच्या राजकारणात शंकरराव चव्हाण यांचे निकटवर्ती व अनुयायी म्हणून ओळखले जात. चव्हाण परिवाराशी निर्माण झालेल्या कौटुंबिक संबंधातून महाविद्यालयीन जीवनात युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकीय पदार्पण करणाऱ्या प्रतापरावांनी दीर्घकाळ काँग्रेस पक्षाची पालखी वाहिली. १९९०च्या दशकात ते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. त्यानंतर १९९२ ते २००२ दरम्यान ते सतत तीनवेळा वेगवेगळ्या मतदारसंघांतून जिल्हा परिषदेवर निवडून आले. अध्यक्षपद वगळता जि. प. तील सर्व पदे त्यांनी भूषविली. २००४ साली ते पहिल्यांदा आणि २०१४ मध्ये दुसऱ्यांदा आमदार झाले.

अशोक चव्हाण यांचे जवळचे सहकारी हीच चिखलीकरांची प्रारंभीच्या काळातील ओळख होती. पण २००७ नंतर त्यांनी लोकभारती, राष्ट्रवादी काँग्रेस नंतर शिवसेना अशी सफरही केली. गावच्या सरपंचपदापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास आता संसदेपर्यंत पोहोचला असून तो पल्ला गाठताना त्यांनी जिल्ह्यातील भाजपला ‘रोशन’ केले. १९९१ ते २०१४ पर्यंत झालेल्या लोकसभेच्या सात निवडणुकांपकी केवळ २००४ ची निवडणूक भाजपला जिंकता आली होती. २०१४ मध्ये सर्वत्र भाजपची हवा अन् मोदी लाट असताना भाजपचे डी. बी. पाटील नांदेडमध्ये पराभूत झाले; पण पाच वषार्ंनंतर त्यांच्या दारुण पराभवाचा वचपा काढताना, चिखलीकर यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना पराभूत करून ‘जायंट किलर’ हा किताब आपल्या नावावर केला.

आपले राजकीय कार्यक्षेत्र सोडून लोकसभा निवडणूक लढविण्याची चिखलीकरांची तयारी अन् इच्छाही नव्हती; पण मधल्या काळात चव्हाण यांच्या एका निकटवर्तीय आमदाराने दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांत चिखलीकरांना एकप्रकारे चुचकारले, ‘हिम्मत असेल तर लोकसभा निवडणूक लढवून दाखव’ असे आव्हान एकेरी भाषेत मिळाल्यावर चिखलीकर मदानात उतरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्यामागे सर्व प्रकारचे बळ उभे केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांभरात ते आमदाराचे खासदार झाले.

२००४ साली शंकरराव चव्हाण यांच्या निधनानंतरच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार व शंकररावांचे जावई भास्करराव खतगावकर यांना नांदेडकरांनी पराभूत केले. आता पुढील दोन महिन्यांनी शंकररावांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत असताना, त्यांचे पुत्र पराभूत झाल्याने काँग्रेससाठी हा मोठा तडाखा होय. काँग्रेसच्या या पराभवाला वंचित बहुजन आघाडीने मोठा हातभार लावला.

First Published on May 25, 2019 1:14 am

Web Title: nandeds first giant killer pratap patil chikhalikar
Next Stories
1 शिवसेनेच्या विजयाची तर राष्ट्रवादीच्या पराभवाची परंपरा कायम
2 अंतर्गत असंतोषानंतरही जळगाव जिल्ह्य़ात ‘कमळ’ टवटवीत
3 सांगलीत भाजपाला ‘वंचित’चा आधार
Just Now!
X