नीलेश पवार

मिरचीचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील बाजार समितीत यंदा मिरचीची घटती आवक चिंतेचा विषय ठरला आहे. त्यात अवकाळी पावसाचाही मिरचीला फटका बसला. या स्थितीमुळे या वर्षी मिरचीच्या दरात तेजी असून त्याचा ग्राहकांना ठसका लागणार आहे. सध्या बाजार समितीत ओल्या मिरचीला क्विंटलला ३०१५ रुपये तर सुक्या मिरचीला साडेसात हजाराच्या जवळपास भाव मिळत आहे.

देशात गुंटुरनंतर मिरचीसाठी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नंदुरबारची ओळख आहे. या ठिकाणची वैशिष्टय़पूर्ण आणि तिखट मिरची ही पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. तिखटपणाबरोबरच विविध वाणांमध्ये उपलब्ध होणारी नंदुरबारची मिरची खरेदीकडे ग्राहकांचा अधिक कल असतो. मात्र गेल्या काही वर्षांत मिरची उत्पादनासाठी उपयुक्त मानल्या जाणाऱ्या नंदुरबार आणि परिसरात मिरचीचे घटते उत्पादन चिंतेचा विषय झाला आहे. दोन वर्षांपूर्वी तर स्थानिक बाजारात मिरचीची आवक कमी झाल्यामुळे प्रक्रिया उद्योगांसाठी व्यापाऱ्यांना गुंटुरवरून मिरची खरेदी करावी लागली होती.

मुळात नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत सुक्या लाल मिरचीपेक्षाही ओल्या मिरचीची आवक अधिक असते. त्यामुळे ती मिरची पथाऱ्यांवर सुकवून त्याचे देठ काढून त्यांची प्रतवारीनिहाय वर्गवारी करून त्यावर प्रक्रिया करून ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाते. मात्र गेल्या काही वर्षांत नंदुरबार शहरालगत दिसणाऱ्या मिरचीच्या पथाऱ्याही आता लुप्त होऊ लागल्या आहेत. वाढते शहरीकरण आणि मिरचीची कमी झालेली आवक यामुळे कधी काळी मैलो न मैल दिसणाऱ्या मिरची पथाऱ्या आता आक्रसल्या आहेत. यंदा जानेवारीमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने मिरची पथाऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. पथाऱ्यांवर वाळत घालण्यासाठी टाकण्यात आलेल्या मिरच्या पाण्यात भिजल्याने व्यापाऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले. शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने पीक नुकसान मिळते तसे नुकसान व्यापाऱ्यांना मिळत नसल्याने हवालदिल झालेले मिरची व्यापारी या संकटातून उभे राहण्याची धडपड करीत आहेत.

मागील पाच वर्षांची आकडेवारी पाहिल्यास २०१६-१७ या वर्षांचा अपवादवगळता आवक कमी होत असल्याचे लक्षात येते. यंदा तर मिरचीची आवक एक लाख क्विंटलपेक्षाही कमी होण्याचा अंदाज आहे. नंदुरबारच्या मिरचीला बाजारपेठेत चांगली मागणी असल्याने यंदा मिरची भावात मात्र तेजी दिसत आहे. दळलेली सुकी मिरची २०० रुपये किलोंच्या घरात पोहचल्याने आगामी काळात हा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. नंदुरबारचे लाल तिखट यंदा सामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणार आहे.

आवक-भावातील चढउतार

*    २०१५-१६ या वर्षांत नंदुरबार बाजार समितीत ८४ हजार ८० क्विंटल ओली मिरची तर पाच हजार ९८ क्विंटल सुक्या मिरचीची आवक झाली. त्यास अनुक्रमे सरासरी २६८२ आणि ८७९६ रुपये भाव मिळाला.

*  २०१६-१७ मध्ये विक्रमी उत्पादन होऊन भाव कमी झाले होते. या वर्षांत बाजार समितीत तब्बल दोन लाख ५४ हजार २०८ क्विंटल ओली मिरची तर ११ हजार ७४२ क्विंटल सुक्या मिरचीची आवक झाली. त्यास १८३० आणि ६१३८ रुपये दर मिळाले.

*  २०१७-१८ वर्षांत आवक कमी झाली. ६४ हजार २७० क्विंटल ओल्या मिरचीची आवक होऊन त्यास दोन हजार ५४ तर १८२५ क्विंटल सुक्या मिरचीची आवक होऊन चार हजार ३४९ रुपये भाव मिळाला.

*  २०१८-१९ वर्षांत ओली मिरची एक लाख ५५ हजार ५०५ क्विंटल (भाव २०७८ रुपये) आणि सुकी मिरचीला ७५९ क्विंटल (५७१३ रुपये)

*  २०१९-२० वर्षांत ओली मिरची एक लाख ८२ हजार ८९८ क्विंटल (२९६९) आणि सुकी मिरची १०५५ क्विंटल (७०५० रुपये) दर मिळाले.

*  २०२०-२१ या वर्षांत फेब्रुवारीच्या प्रारंभापर्यंत ७४ हजार ७०२ क्विंटल ओली मिरची, तर ३४३२ क्विंटल सुक्या मिरचीची आवक झाली आहे. त्यास अनुक्रमे तीन हजार १५ आणि सात हजार ३२९ रुपये सरासरी भाव मिळाला. या हंगामात एक लाख क्विंटल आवकेचा टप्पा गाठला जाण्याची शक्यता धुसर बनली आहे. आवक घटल्याने दरावर परिणाम होणे स्वाभाविक असल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.