नीलेश पवार, लोकसत्ता

नंदुरबार : जिल्ह्य़ातील राजकीयदृष्टय़ा वजनदार नेत्यांनी पक्षांतर केल्यावर चित्र कसे बदलते, हे जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालामधून दिसून आले आहे. पक्षांतराचा सर्वाधिक फटका सत्ताधारी काँग्रेस आणि तत्कालीन विरोधक असलेल्या राष्ट्रवादीला बसला आहे. सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे लढलेल्या या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळविण्यात अपयश आले असतानाच राष्ट्रवादीची पुरती पीछेहाट झाली. अशातच मागील निवडणुकीत होत्याचे नव्हते असणारी भाजप आणि शिवसेनेने यंदा जोरदार मुसंडी मारली. भाजप आणि काँग्रेस यांना समान जागा मिळाल्याने त्यांना सात जागा मिळालेल्या शिवसेनेचे सहकार्य घेण्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही. त्यातच ज्येष्ठ नेते आपल्या घरातच अध्यक्षपद राहण्याची सोय बघत असल्याने सत्तेचे त्रांगडे निर्माण झाले आहे.

मागील निवडणुकीत ५६ पैकी २९ जागा मिळवून सत्तेत असणाऱ्या काँग्रेसची घोडदौड रोखली गेली. त्यांना अवघ्या २३ जागांवरच समाधान मानावे लागले. मुळातच विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्य़ातील ज्येष्ठ नेत्याचे झालेले पक्षांतर याला कारणीभूत ठरले. काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार चंद्रकात रघुवंशी यांची भूमिका यात निर्णायक ठरली. नंदुरबार तालुक्यात त्यामुळे काँग्रेसला जबर हादरा बसला. तालुक्यात निवडून आलेला एकमेव काँग्रेस सदस्यही रघुवंशी समर्थक आहे. शहादा तालुक्यात दीपक पाटील यांनी भाजपमध्ये केलेल्या पक्षांतरामुळे शहादा आणि तळोद्यात काँग्रेसला फटका बसला. नवापूरचा गड नाईक परिवाराने कायम राखला असला तरी भरत गावित यांच्या रूपाने काँग्रेसच्या दोन जागा या भाजपकडे गेल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे के. सी. पाडवींच्या गळ्यात आदिवासी विकासमंत्री पदाची माळ पडल्यानंतर त्याचा काहीसा फायदा अक्कलकुवा तालुक्यात दिसला असला तरी त्यांच्या पत्नीचा झालेला पराभव आणि पंचायत समिती अक्राणीवर शिवसेनेने मिळवलेला विजय हा त्यांना जोरदार धक्का मानला जात आहे.

मागील वेळी २४ सदस्य संख्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या तीन जागा जिंकता आल्या. निवडून आलेले तीनही सदस्य शरद गावितांच्या माध्यमातून भाजपच्या नजीकच असल्याने राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या डॉ. विजयकुमार गावितांनी राष्ट्रवादीचे घडय़ाळ बिघडवले आहे. गेल्या वेळी एक सदस्य असलेल्या भाजपने २३ सदस्यांपर्यंत मजल मारली. नंदुरबार, शहादा आणि तळोदा पंचायत समितीत ते सत्तेच्या जवळ पोहोचले आहेत. शिवसेनेकडे सत्तेची चावी असून प्रथमच सात सदस्य विजयी झाल्याने चंद्रकात रघुवंशी यांचा सेनाप्रवेश हा त्यांच्यासाठी लाभदायक ठरला आहे. याशिवाय अक्राणी पंचायत समितीवर एकहाती सत्ता आणि नंदुरबार पंचायत समितीमध्ये केलेली घोडदौड शिवसेनेला जिल्ह्य़ात हातपाय पसरविण्यास उपयोगी ठरू शकेल.

जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेची चावी शिवसेनेकडे असल्याने आता सेनेच्या मनधरणीसाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. सत्तेपेक्षा अध्यक्षपद आपल्या घरात कसे येईल, याची चिंता भाजप, काँग्रेस आणि सेनेच्या नेत्यांना आहे. भाजपचे नेते डॉ. विजयकुमार गावित यांच्या पत्नी कुमुदिनी गावित याआधीही जिल्हा परिषद अध्यक्ष राहिल्याने पुन्हा अध्यक्षपद मिळावे यासाठी गावित परिवार सेनेची मनधरणी करीत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचे दोन पुत्र जिल्हा परिषदेमध्ये निवडून गेल्याने त्यांच्या नावाचीही चर्चा आहे. काँग्रेसचे नेते पद्माकर वळवी यांची कन्या सीमा वळवी याही अध्यक्षपदाच्या दावेदार मानल्या जात आहेत.

एकूण गट      ५६

* भाजप       २३

* काँग्रेस       २३

* राष्ट्रवादी     ०३

* शिवसेना     ०७