नीलेश पवार

महिनाभरात करोनाबाधितांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ, खाटांसाठी नातेवाईकांना करावी लागणारी वणवण आणि त्यात रेमडेसिवीरचा तुटवडा अशा बिकट स्थितीत औषधे वा रुग्णालयात खाटा मिळवण्यासाठी रुग्णांसह नातेवाईक लगतच्या गुजरातची वाट धरू लागल्याचे चित्र आहे. या संकटात स्थानिक पातळीवर प्रभावी उपाययोजनांची गरज असताना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर पालकमंत्री अ‍ॅड. के. सी. पाडवी गायब झाले. मुंबईतून त्यांच्यामार्फत परिस्थितीवर नियंत्रणाचा सोपस्कार पार पाडला गेला. करोना संकटात अनेक नेत्यांना जिल्ह््याचा विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी धाव घेऊन आढावा घेतला. परंतु, परिस्थितीत अद्याप फारसा फरक पडलेला नाही.

सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या नंदुरबारमध्ये सध्या बिकट परिस्थिती असून करोनाचा उद्रेक दिवसागणिक वाढत आहे. जिल्ह््याची लोकसंख्या जेमतेम १५ लाखाच्या आसपास आहे. ग्रामीण भागातील खेड्यापाड्यापर्यंत त्याचा फैलाव झाला असताना तोकड्या आरोग्य यंत्रणेमुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यात जिल्’ााचे पालकत्व असलेले लोकप्रतिनिधी मुंबईत राहूनच दूरदृश्य प्रणालीद्वारे परिस्थितीचा आढावा घेत राहिल्याने प्रशासकीय यंत्रणेवर सर्व भिस्त राहिली.

वाढत्या रुग्णांमुळे सध्या जिल्ह््यात प्राणवायूयुक्त खाटा, व्हेंटिलेटरची कमतरता असून यामुळे खासगीसह शासकीय रुग्णालयातही खाट शिल्लक नसल्याचे फलक लागले आहेत. रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे नातेवाईकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. शासकीयवगळता जिल्ह््यातील सर्वच खासगी रुग्णालयात रेमडेसिवीर मिळत नाही. त्यामुळे जे नेते अथवा सेवाभावी संस्थांकडून अल्पदरात रेमडेसिवीर उपलब्ध करून दिले जाते, त्या ठिकाणी लोकांच्या अक्षरश: लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे. दिवसाला आलेला साठा अपुरा पडत असल्याने अनेक रुग्णांचे नातेवाईक इंजेक्शन घेण्यासाठी गुजरात, नाशिक, मुंबईकडे धाव घेत आहेत.

करोनामुळे विदारक स्थिती झाली असताना जिल्’ााचे पालकमंत्री अ‍ॅड. के . सी. पाडवी हे मधल्या काळात अंतर्धान पावले होते. मुख्यमंत्री दौऱ्यावेळी १९ मार्च रोजी ते नंदुरबारमध्ये होते. मात्र त्यानंतर १५ दिवस ते मुंबईतून जिल्ह््याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवत होते. करोनाच्या संकटात पाडवी यांनी तोकड्या आरोग्य यंत्रणेला पाठबळ देऊन नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे. आवश्यक त्या खाटांसह रेमडेसिवीरचा तुटवडा दूर करण्यासाठी युद्धपातळीवर नियोजनाची गरज आहे. तसे होत नसल्याने पालकमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले जाऊ लागले. मग त्यांना नंदुरबारला प्रत्यक्ष येण्याची गरज वाटली. बैठक घेऊन खासगी रुग्णालयातही रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्याचे त्यांनी मान्य केले. रुग्णांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे ते म्हणाले.

सद्य:स्थितीत सर्व लोकप्रतिनिधींनी राजकारण सोडून लोकांच्या मदतीला धावून जाण्याची गरज व्यक्त होत आहे. काही राजकीय मंडळी आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. मात्र शासन दरबारातून काही समस्यांचे तात्काळ निवारण होण्याची आवश्यकता अधोरेखित केली जात आहे. महिनाभरात १३ हजारहून अधिक जण बाधित झाले आहेत. जिल्ह््यातील वाढता मृत्युदर चिंतेचा विषय झाला आहे.

गुजरात प्रशासनाकडून विचारणा

स्थानिक पातळीवर आरोग्य यंत्रणेत अनेक त्रुटी आहेत. पुरेसे मनुष्यबळ नाही. रुग्णसंख्या वाढत असल्याने खासगी रुग्णालयातील खाटा करोनाबाधितांसाठी आरक्षित कराव्या लागल्या. इतके करूनही जिल्’ाात खाटा मिळत नसल्याने महाराष्ट्रातील अनेक रुग्ण गुजरातमध्ये जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या गुजरातमधील अनेक खासगी रुग्णालयात खाटा पूर्ण क्षमतेने भरल्या. ही बाब तेथील स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी थेट खासदारांना याबाबत विचारणा केली होती. यानंतर खासदार डॉ. हीना गावित यांनी नवापूर येथे परिस्थितीची पाहणी केली.