रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील काँग्रेस आघाडीचे उमेदवार निलेश राणे यांच्या विरोधात प्रचार करत असल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळ भिसे यांची हकालपट्टी करतानाच राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. मात्र, केसरकर यांनी आमदारकीचा राजीनामा पक्षाकडे पाठवून राणेंविरोधात उघड दंड थोपटल्याने कोकणात राणेंची झालेली कोंडी फुटण्याची चिन्हे दिसत नाहीत.
नारायण राणे यांचे पुत्र व विद्यमान खासदार नीलेश राणे यांना काँग्रेस आघाडीने रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरुवातीपासूनच राणेंच्या विरोधात प्रचारात उतरले आहेत. या पाश्र्वभूमीवर राणे यांच्या आग्रहाखातर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा रविवारी सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली होती. पण याही दबावाला राणेविरोधकांनी धूप घातली नाही. अर्थात त्यांच्या निर्धाराचा पक्षश्रेष्ठींना आधीच अंदाज आला असल्यामुळे पवार प्रचारसभेसाठी येथे येत असतानाच राष्ट्रवादीच्या मुंबईतील मुख्यालयातून भिसे यांच्याविरुध्द कारवाईची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर केसरकर यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे पवारांनी सभेत सांगितले.
या सभेत बोलताना पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आघाडीचा धर्म पाळण्याची ताकीदही केली. मात्र, तरीही कोकणात राणे यांना असलेला विरोध शमण्याची चिन्हे नाहीत. उलट त्यामुळे राणे विरोधकांना रान मोकळे मिळाले आहे. राणे यांच्याकडून येत असलेल्या दबावामुळे राष्ट्रवादीकडून कारवाई होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हाध्यक्ष भिसे यांनी जिल्ह्य़ातील चारशेपेक्षा जास्त प्रमुख कार्यकर्त्यांचे राजीनामे दोन दिवसांपूर्वीच आपल्या खिशात ठेवले होते. रविवारी या कारवाईचे संकेत मिळताच आमदारांसह सर्वानी ते पक्षश्रेष्ठींकडे सोपवले.
त्यामुळे पवारांनी सावंतवाडीच्या जाहीर सभेत त्यांच्यावर केलेली कडक टीका निर्थक ठरली.आत्तापर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिकृत पदाधिकारी-कार्यकर्ते म्हणून असलेल्या बंधनांमधून जणू पक्षानेच त्यांना मुक्त केले आणि निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात राणेंशी उघड सामना करण्यास हे सर्वजण सज्ज झाले आहेत.  आमदार केसरकर यांनी सोमवारी सकाळी समर्थक कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा आयोजित केला आहे. त्यामध्ये ते पुढील भूमिका मांडणार आहेत. हा गट निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करण्याच्या मानसिकतेत आहे.

माझ्या पक्षाच्या काही लोकांना अवदसा आठवली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी राज्यात आघाडी असून राज्यात दोन्ही पक्ष निवडणुका लढवत आहेत. देशाचा प्रश्न असतो तेव्हा देशाचा विचार करतो. देशाचा प्रश्न असताना काही लोक घरातील भांडण या निवडणुकीत बाहेर काढत आहेत. पक्ष संघटना स्वत:भोवती घेऊन वावरणाऱ्यांनी लक्षात घ्यावे, कोणी कुठे गेला तरी पक्ष उभा राहू शकतो.
शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष