काँग्रेस पक्षाचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना मारहाण झाल्याची तक्रार हे सेनानेत्यांचे षड्यंत्र असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केला आहे.

राणे यांचे चिरंजीव आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी आपल्याला गेल्या २४ एप्रिल रोजी रात्री चिपळूण येथील घरातून जबरदस्तीने उचलून गाडीत कोंबले आणि मारहाण करत मुंबईला नेले, अशा आशयाची तक्रार सावंत यांनी पोलिसांकडे नोंदवली आहे. या प्रकरणी नीलेश यांच्यासह पाच जणांविरुद्घ अपहरण व मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यावर चिपळूण येथे पत्रकार परिषदेत प्रथमच जाहीर भाष्य करताना राणे म्हणाले की, सावंत हा काँग्रेसचा पदाधिकारी होता. त्याच्याकडे नीलेशचे नियमित येणे-जाणे होते. त्याला वेळोवेळी खर्चासाठी पैसे दिले होते. पण गेल्या काही काळापासून तो सेना नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. गेल्या २४ एप्रिलला रात्री नीलेश संदीप सावंतकडे गेला होता. थोडय़ा वेळाने सावंत स्वत:हून स्वखुशीने गाडीत येऊन बसला. त्याचे अपहरण झालेले नव्हते. तसेच त्याला कुठल्याही प्रकारची शारीरिक इजा किंवा दुखापत झालेली नव्हती. मी रुग्णालयात भेटलो तेव्हाही त्याच्या अंगावर कोणतीही जखम आढळली नाही. मुंबईत मारहाण झाली असेल तर जवळच्या रुग्णालयात उपचार करून न घेता तो ठाण्याच्या रुग्णालयात का दाखल झाला, असा सवाल राणे यांननी केला.

(((   नारायण राणे  ))