काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षासह जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आचारसंहितेपूर्वी खरेदी केलेल्या तेराही बोलेरो गाडय़ा पोलिसांनी जप्त केल्या. या गाडय़ांपैकी कणकवलीत जप्त केलेली गाडी जिल्हा मुख्यालय ओरोस या ठिकाणी पोलीस कर्मचारी नेत असताना अपघात झाला. या अपघातात पोलिसासह तीन जण जखमी झाले. त्यावरून काँग्रेस पदाधिकाऱ्यानी सोमवारी मध्यरात्री कणकवली पोलीस ठाण्यात जोरदार राडा केला. या प्रकरणामुळे काँग्रेस नेते नारायण राणे पोलीस यंत्रणेवर संतप्त झाले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्षासह, सेवादल अध्यक्ष, तालुका अध्यक्ष अशा १३ पदाधिकाऱ्यांनी बोलेरो गाडय़ा निवडणूक आचारसंहितेपूर्वीच खरेदी केल्या असल्याने निवडणूक विभाग किंवा पोलीस यंत्रणेने कारवाई करण्याचा संबंध येत नसल्याचे सर्व पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या तेराही गाडय़ांच्या संदर्भात अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याने त्या जप्त करण्यात आल्या आहेत. सोमवारी रात्री कणकवलीत जप्त केलेली बोलेरो पोलीस कर्मचारी पांडुरंग पांढरे ओरोस येथे घेऊन जाताना अपघात घडला. या अपघातानंतर कणकवली पोलीस ठाण्यात रात्री दोन वाजेपर्यंत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जोरदार राडा करून पोलीस अधीक्षकांना पाचारण करण्याचा आग्रह केला. मात्र, पोलीस अधीक्षक अखेपर्यंत आलेच नाहीत.