सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपळूण-पिरोळे (चिपी) विमानतळावरून ९ ऑक्टोबर रोजी नागरी विमानवाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली होती. मात्र, चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख ठरल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला यायलाच पाहिजे असं काही नाही, असं राणे म्हणाले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना बोलावयची गरज नाही हे सांगणारे तुम्ही कोण? तुम्हाला काय अधिकार आहे सांगायचा? जर तुम्हाला माहिती नसेल तर शिकून घ्या असे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले होते. आता नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

चिपी विमानतळावरुन माजी खासदार निलेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली आहे. कुणी हवसे गवसे नवसे खासदार झाले म्हणून विमानतळ होत नाही असं निलेश राणे यांनी टीव्ही९ सोबत बोलताना म्हटले आहे. “नारायण राणेंचे केंद्रात वेगळं वजन आहे. त्यांची एक वेगळी प्रतिमा आहे. त्या सगळ्याचा जिल्ह्याच्या विकासाला फायदा होतो. आता हौसे, नवसे, गौसे फक्त खासदार झाले म्हणून चिपी विमानतळ आलेलं नाही. नारायण राणेंसारखा माणूस केंद्रीय मंत्री झाला आणि नंतर चिपी विमानतळ आलं हे मला सांगायची गरज नाही,” असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

९ ऑक्टोबर रोजी नारायण राणे व ज्योतिरादित्य शिंदे दिल्लीहून मुंबईला जातील व तिथून ते चिपी विमानतळावर पोहोचतील असे सांगण्यात आलं होतं. मात्र, या विमानतळावरून ७ ऑक्टोबरपासून विमानसेवा सुरू होईल, असे ट्वीट शिवसेनेचे सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केल्यामुळे नवा वाद सुरू झाला होता. त्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी विमानतळ सुरु होण्याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आणि हे विमानतळ ९ तारखेपासून सुरु होईल असे सांगितले.

…पण आयत्या बिळातला नागोबा असता कामा नये; चिपी विमानतळावरून विनायक राऊतांची नारायण राणेंवर टीका

यावेळी सिंधुदुर्ग विमानतळ हे महाराष्ट्राचे आहे. केंद्र सरकार हे केवळ परवाना देण्याचे काम करत आहे. आता जे हुशारकी करत आहेत त्यांना एक लक्षात असलं पाहिजे की, मुख्यमंत्र्यांना बोलावयची गरज नाही हे सांगणारे तुम्ही कोण? तुम्हाला काय अधिकार आहे सांगायचा? असे विनायक राऊत यांनी म्हटले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी यु-टर्न घेत मुख्यमंत्री ठाकरे चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू, असं त्यांनी म्हटलं.