आपण म्हणजेच कोकणातील काँग्रेस, अशा थाटात गेले सुमारे एक तप रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील काँग्रेस पक्ष दावणीला बांधून फिरणाऱ्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी गेल्या आठवडय़ात या दोन्ही जिल्हय़ांमध्ये त्यांच्याविना बैठका घेत अस्सल काँग्रेसी झटका दिला आहे, तर दुसरीकडे भाजपने त्यांना पूर्णपणे वाकवूनच पक्षामध्ये घेण्याचे डावपेच चालवले आहेत. त्यामुळे सध्या तरी राणेंची परिस्थिती ‘दोन्ही घरी उपाशी’ अशी झाली आहे.

भाजपमध्ये प्रवेशासाठी गेले काही महिने राणे आणि त्यांचे भाजपतील समर्थक नेत्यांनी चालवलेली खटपट सर्वज्ञात आहे. त्यांना या पक्षामध्ये प्रवेश मिळणार असल्याचे अनेक भाजप नेते खात्रीशीरपणे सांगत आहेत. त्याबाबत काही मुहूर्तही जाहीर झाले. पण प्रत्यक्षात अजून तसे काही घडलले नाही. तरीसुद्धा, आपल्याला सर्वच राजकीय पक्षांकडून ‘मागणी’ आहे, अशी शेखी मिरवीत राणे वावरत होते. कारण काँग्रेसची सध्याची विकलांग अवस्था पाहता, त्यांच्याकडून आपल्या बालेकिल्ल्यात येऊन थेट आव्हान दिले जाईल, असे त्यांना अजिबात अपेक्षित नसावे आणि आज ना उद्या भाजपमध्ये प्रवेश मिळणार, असा विश्वास ते बाळगून आहेत. पण गेल्या शुक्रवारी सावंतवाडीत आणि त्यापाठोपाठ शनिवारी चिपळूणमध्ये काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष खासदार हुसैन दलवाई यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन्ही जिल्हा काँग्रेसच्या बैठका आयोजित करण्यात आल्या. सावंतवाडीमधील बैठकीच्याच दिवशी ओसरगाव येथे दस्तुरखुद्द राणे यांच्या उपस्थितीत त्यांच्या समर्थकांनी समांतर मेळावा भरवला. या मेळाव्याला स्वाभाविकपणे मोठी गर्दी जमली होती. त्याच दिवशी नांदेडमध्ये राहुल गांधी यांची सभा आयोजित केलेली होती. त्या सभेला राणेंना निमंत्रित न करून पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी आधीच राणेंना नाकारल्याचे सूचित केले होते. त्यावर पुन्हा त्यांच्या घरच्या मैदानावर अशा प्रकारे त्यांना दूर ठेवत बैठका आयोजित करत त्यांच्या जखमेवर मीठ चोळले. याबाबत स्थानिक पत्रकारांशी बोलताना राणे यांचे अवघडलेपण लपू शकले नाही. त्यांचे चिरंजीव आमदार नीतेश यांनी त्याबाबत सावंतवाडीत काँग्रेसच्या बैठकीत जाऊन आपल्या स्टाइलमध्ये जाबही विचारला. पण मत्स्य अधिकाऱ्याच्या अंगावर मासा फेकत शिवीगाळ करणे वेगळे आणि दलवाई किंवा माजी आरोग्यमंत्री भाई सावंत यांच्याकडून राजकारणाचे बाळकडू प्यायलेले त्यांचे चिरंजीव विकास सावंत यांच्यापुढे राजकीय वाद घालणे वेगळे, हे त्यांना कसे कळणार? त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांची सावंतांनी शांतपणे उत्तरे दिली, तर राणे जिल्हय़ात आहेत, हे आपल्याला माहीतच नव्हते, असा साळसूदपणाचा आव आणत खासदार दलवाई यांनी, पक्षामध्ये सन्मान हवा असेल तर राणेंचे कार्यकर्ते त्यांच्या भावी वाटचालीबाबत पसरवीत असलेले गैरसमज थांबले पाहिजेत, असे स्पष्टपणे बजावले.

केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
Former corporator Leena Garad suspended by BJP joins Thackeray groups Shiv Sena
भाजपच्या निलंबीत माजी नगरसेविकेचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”
ED and CBI have been the operatives of Narendra Modi in the country for the last 10 years says nana patole
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ईडी व सीबीआय हे कार्यकर्ते; नाना पटोले म्हणतात, “त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये…”

दुसऱ्या दिवशी शनिवारी, चिपळूणमध्ये रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता गृहीत धरून राणे समर्थकांना सभागृहात प्रवेशसुद्धा मिळू नये म्हणून केवळ पोलीस नव्हे, तर दंगल नियंत्रण पथक तैनात होईल, अशी व्यवस्था केली गेली. एकूण परिस्थिती ओळखून राणेंचे दोन्ही पुत्र या बैठकीपासून दूर राहिले. तसेच त्यांनी नियुक्त केलेले स्थानिक पदाधिकारी बैठकीच्या ठिकाणी जाऊन, तेथील बॅनरवर त्यांच्या नेत्यांचे छायाचित्रसुद्धा नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यापलीकडे फार काही करू शकले नाहीत आणि जिल्हा प्रभारी विश्वनाथ पाटील यांनी जिल्हा काँग्रेसच्या सर्व समित्या बरखास्त करीत राणे समर्थकांना पक्षापासून अलगद दूर केले. कारण बहुतेक पदाधिकारी राणे पिता-पुत्रांनीच नियुक्त केलेले आहेत.

प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी राणेंना अशा प्रकारे सरळ सरळ अंगावर घेण्यामागे दोन कारणे आहेत. एक म्हणजे सध्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण डिसेंबर २००८ मध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा राणेंनी भरपूर थयथयाट करीत कणकवलीत जाहीर मेळावा भरवून थेट सोनियांवरच शरसंधान केले होते. अशा गोष्टी काँग्रेसजन सहज विसरत नसतात आणि दुसरे त्याहून महत्त्वाचे म्हणजे, मागील लोकसभा निवडणुकीत चिरंजीव नीलेश यांचा पराभव आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीत स्वत: राणेंचा त्यांच्या बालेकिल्ल्यात झालेला पराभव, कोकणातील त्यांची राजकीय ताकद क्षीण होत चालली असल्याचे निदर्शक आहे. जास्त नेमकेपणाने बोलायचे तर, सिंधुदुर्ग जिल्हय़ातील ८ तालुक्यांपैकी निम्म्याच भागामध्ये-कणकवली, कुडाळ, मालवण आणि सावंतवाडी-राणेंचा प्रभाव उरला आहे, तर रत्नागिरी जिल्हय़ात चिपळूण आणि राजापूर या दोन तालुक्यांपलीकडे राणे काँग्रेसचे अस्तित्वसुद्धा नाही. जुने हिशेब मिटवण्यासाठी अशी संधी सोडतील तर ते काँग्रेसवाले कसले आणि राणेंचे दुर्दैव असे की, अशा प्रकारे अप्रत्यक्ष हकालपट्टी होईपर्यंत गेल्या बारा वर्षांत हा पक्ष त्यांना कधी समजलाच नाही.

या बैठकांबाबत दलवाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोजक्या शब्दात राणेंच्या उलटसुलट उक्ती आणि कृतींचा आढावा घेत सांगितले की, येथून पुढे, याल तर तुमच्यासह, नाही तर तुमच्याविना, हे कोकणात काँग्रेसचे सूत्र राहणार आहे. या पैकी दुसरा पर्यायच खरा, हे त्यांनी दाखवून दिलेच आहे.