मी शिवसेनेत ३९ वष्रे काढली आहेत. त्यापैकी शेवटची १५-२० वष्रे मी बाळासाहेब आणि माँसाहेबांच्या अतिशय जवळ होतो. त्यावेळी त्यांना सर्वात जास्त मानसिक त्रास देऊन त्यांचा छळ उद्धव यांनीच केला असून मी त्याचा साक्षीदार आहे, अशी जळजळीत टीका नारायण राणे यांनी शुक्रवारी सिंधुदुर्गात केली. सोमवारी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा करून ते मुंबईतून थेट सिंधुदुर्गात आले.
राणे भाजपमध्ये जाणार अशी चर्चाही गुरुवारीच सुरू झाली होती. त्यावेळी, बाळासाहेबांना ज्यांनी त्रास दिला त्यांना महायुतीमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असे उद्धव यांनी जाहीर केले. या पाश्र्वभूमीवर हातखंबा येथे पत्रकार परिषदेत उद्धव यांचा एकेरी उल्लेख करीत राणे यांनी त्यांच्यावर तोंडसुख घेतले. बाळासाहेबांचे नाव सांगायला उद्धव अजिबात लायक नाहीत. माझ्या बाबतीत त्यांनी काही बोलू नये, अन्यथा मी त्यांचे वस्त्रहरण केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
भाजपने मला प्रवेश देऊ नये, हे सांगण्याचा अधिकार उद्धवना कोणी दिला, असा सवाल त्यांनी केला. ज्यांना स्वत:चा पक्ष सांभाळता येत नाही त्यांनी याबाबत बोलू नये, असे सांगून राणे पुढे म्हणाले की, मी राजीनामा दिल्यानंतर कुठे जाणार, हे ते कशावरुन ठरवतात? राजकारण हा त्यांचा पोटापाण्याचा धंदा आहे, माझा नाही. माझ्या राजीनाम्याची कारणे मी सोमवारी सांगेन. पण त्याचा अर्थ मी दुसऱ्या कुठल्यातरी वाटेवर आहे, असा काढू नये.
मोदी फॅक्टर आता राहिलेला नाही. हे सरकार शब्दाला जागत नाही, हे जनतेला महिनाभरातच कळून चुकले आहे, या शब्दांत मोदींवर थेट टीका करीत भाजपमध्ये जाण्याचा मनोदय नसल्याचेही त्यांनी सूचित केले.
शक्तिप्रदर्शन फसले
कोकणात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत शक्तीप्रदर्शन करण्याचे राणे यांनी ठरवले होते. पण खेडचा भरणे नाका वगळता मुंबई-गोवा महामार्गावर त्यांचे विशेष स्वागत झाले नाही. राणे यांच्याबरोबर काँग्रेसमध्ये गेलेले माजी आमदार सुभाष बने, गणपत कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर व प्रमुख कार्यकर्ते या ‘रोड शो’पासून दूरच राहिले.
काँग्रेसवर टीका टाळली
तुम्ही २००८मध्येही काँग्रेसपासून दुरावला होतात. गेल्या सहा वर्षांत परिस्थितीत काहीच फरक पडलेला नाही का, असे विचारता राणे म्हणाले की, मी कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींवर टीका करु इच्छित नाही. पण सध्याच्या काँग्रेसमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांला न्याय मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आपण मंत्रीपदाचा त्याग का करीत आहोत आणि पुढील दिशा काय राहील, याबाबत सोमवारीच भूमिका मांडणार असल्याचे सांगत त्यांनी सर्वच प्रश्नांना बगल दिली.