दोडामार्ग बस स्थानकाचा शुभारंभ करताना पायाभूत सुविधा द्या, अन्यथा उद्घाटन कार्यक्रम रोखण्याचा इशारा देऊन नवीन बस स्थानक आवारात गोंधळ घालणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात पोलीस केस दाखल करण्यात आल्याने काँग्रेस नेते नारायण राणे यांनी या केसीस उद्या शुक्रवारी २६ फेब्रुवारी दुपापर्यंत मागे घ्या, अन्यथा जिल्ह्य़ात एसटी बसेस रोखण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात खळबळ उडाली आहे.
परिवहन मंत्री दिनकर रावते, आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी दर्शन घेऊन सिंधुदुर्गनगरी एस.टी. आगार भूमीपूजन आणि दोडामार्ग एस.टी. आगार उद्घाटन समारंभ करतील असा दौरा आयोजित केला. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी दोडामार्ग आगारात सुविधांची वानवा असल्याने उद्घाटन समारंभ उधळून लावण्याचा इशारा दिला होता.
दोडामार्ग आगार उद्घाटन समारंभानिमित्ताने काँग्रेस आणि शिवसेनेने इशारे दिले. काँग्रेसने उद्घाटन समारंभ उधळून लावण्याचा इशारा दिल्यावर शिवसेनेने उधळून दाखवा असे प्रती आवाहन दिले. त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पूर्वसंधेला बुधवारी उद्घाटन समारंभाच्या स्टेजवर ठिय्या आंदोलन केले. त्याशिवाय एस.टी. अधिकाऱ्याविरोधात तोंड सुखदेखील घेतले. काँग्रेसच्या या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी पंधरा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल केले. त्यामुळे माजी मुख्यमंत्री नारायण राणे संतापले. आज परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या आगाराचे उद्घाटनदेखील केले. आंगणेवाडी येथे भराडी मातेचे दर्शन घेतल्यावर नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना एस. टी. विभागाला आणि पोलिसांना इशारा दिला. लोकशाहीत आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर सत्ताधारी खोटय़ा केसेस दाखल करत असतील तर सोडणार नाही. या केसेस उद्या शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत पोलिसांनी मागे घ्याव्यात अन्यथा जिल्ह्य़ात एकही एस.टी. फीरणार नाही असा इशारा दिला.
दोडामार्ग एस.टी. आगारात सुविधा नाहीत, अशा अपुऱ्या सुविधावर आधारीत बस आगाराचे उद्घाटन करू नये अशा रास्त मागणी काँग्रेसची होती. ही कार्यकर्त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला म्हणून खोटय़ा पोलीस केसीस सत्तारूढ पक्षाच्या इशाऱ्यावर दाखल होत असतील तर ते खपवून घेणार नाही. उद्या शुक्रवारी सकाळी केसीस मागे घेतल्या नाहीत तर एस.टी. बसेस रोखण्यात येतील असा इशारा राणे दिला.
दरम्यान परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते दोडामार्ग बस स्थानकाचे उद्घाटन संध्याकाळी करण्यात आले. तेव्हा काँग्रेसने तेथे विरोध केलेला नाही असे शिवसेनेकडून सांगण्यात आले. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एस.टी. महामंडळाच्या कामाची माहिती दिली. पर्यटनासाठी येणाऱ्या वाहनाकडून टॅक्स घेतला जाणार नाही याची दक्षता घेऊन सिंधुदुर्गच्या पर्यटन विभागासाठी परिवहन मंत्रालयाचे धोरण विषद केले. यावेळी पालकमंत्री केसरकर यांनीदेखील विचार मांडले.